संख्यावाचनातील बदल, तज्ज्ञांची समिती नेमूनच निर्णय घेणार- मुख्यमंत्री

इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’च्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या बदलांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याने शिक्षणतज्ज्ञांकडून या बदलांवर टीका होत आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयावर बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभेत जोरदार प्रहार केले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञांची समिती नेमून बदल स्वीकारायचे की नाही यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्ट केलं.

पवारांची टीका 

राज्यपालांच्या भाषणानंतर बोलताना अजित पवार यांनी शाब्दीक कोटी करत गणिताच्या पुस्तकातील बदलांवरुन सरकारला चांगलंच झोडपलं. नवीन बदलानुसार, ऊर्जामंत्री बावनकुळे साहेबांना बोलवताना आम्ही... वो पन्नास दोन कुळे साहेब.... पन्नास दोन कुळे साहेब आले बघा... असं म्हणायचं का ? किंवा मुख्यमत्री महोदयांच नाव घेताना, फडण दोन-शून्य असं म्हणायचं का ? असा प्रश्न उपस्थित करत या बदलाची खिल्ली उडवली. त्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच हा निर्णय घेतला असेल, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून शिक्षण खातं काढून घेतलं. परंतु, गमतीचा भाग सोडून देत हा बदल स्वीकाहार्य नसून हा बदल रद्द करण्याची मागणी त्यांनी नवीन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली. 

 त्यावर खुलासा करताना, जुनी संख्यानामे हद्दपार करण्यात आली नसल्याने या बदलाने इतकंही काही नुकसान होणार नव्हतं. पण विरोधकांच्या भावना लक्षात घेता तज्ज्ञांची समिती नेमून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


हेही वाचा-

उसळीत चिकन, कँटीन चालकावर काय कारवाई करणार? अजित पवारांचा सरकारला प्रश्न

आता एकवीस नाही, वीस एक म्हणा, बालभारतीच्या पुस्तकात अजब बदल


पुढील बातमी
इतर बातम्या