ठरलंच! ठाकरे बंधूंचा विजय मेळावा 'या' ठिकाणी होणार

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द करण्यात आला. यानंतर 5 जुलैला मोर्चा काढण्याऐवजी एकत्र विजयी सभा होईल, असे खासदार संजय राऊतांनी जाहीर केले. आता या विजयी सभेचे ठिकाण ठरले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय असून 5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे, असे सामना वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे.

ठाकरे बंधूंची विजयी सभा वरळी येथील डोम सभागृहात होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी सुरु झाली आहे.

विजयी जल्लोष साजरा केला जाणार असून हा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये पार पडणार आहे. एकीकडे यासंदर्भातील तयारी सुरु असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील 13 कोटी जनतेला एक संयुक्त पत्र लिहिलं आहे.

"मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं...! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो," असं या पत्रात म्हटलं आहे. तसेच पत्रात पुढे ठाकरे बंधुंनी, "त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे," असं म्हटलं आहे.

पत्राच्या शेवटी, "वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय...!" असं नमूद केलं आहे. पत्राच्या शेवटी, "आपले नम्र" असं म्हणत एकाच ओळीत "राज ठाकरे - उद्धव ठाकरे" असं लिहिलेलं आहे.


हेही वाचा

ठाण्यात आनंद दिघेंचा पुतळा बनवण्यात येणार

पुढील बातमी
इतर बातम्या