‘पाठीत वार करणाऱ्यांना सर्जिकल स्ट्राईक दाखवू’

मुंबई - 'पंचवीस वर्षे ज्यांना मित्र मानले त्यांनी पाठी मागून वार केले. पण हिंमत असेल तर आता अंगावर या, मग आम्ही दाखवू सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ते', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपला खुले आव्हान दिले.

'पालिका निवडणुकांमध्ये सोबत यायचे असेल तर या, आम्ही कटोरा घेऊन भीक मागणार नाही', असे म्हणत पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्यास शिवसेना तयार असल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे यांनी यावेळी दिले. शिवाजी पार्क होणाऱ्या शिवसेनेच्या 50 व्या दसरा मेळाव्याकडे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे शिवसैनिकांसह मुंबईकरांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे पंतप्रधानांसह मित्रपक्ष भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चिमटे काढले.

सर्जिकल स्ट्राईकचे जोरदार समर्थन करतानाच ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईकला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. तसेच मराठा आरक्षण, अॅट्राॅसिटी, युती, कोपर्डी अशा अनेक प्रश्नांना पक्षप्रमुखांनी हात घातला. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या आक्रमकतेची अपेक्षा शिवसैनिक करत होते ती आक्रमकता आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसून आली नाही. त्यामुळे सावधपणे उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्याने शिवसेनला या मेळाव्यातून बळ मिळेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

  • मुख्यमंत्र्यांनी आपला नेता कोण हे आधी ठरवावं
  • सर्जिकल स्ट्राईकसाठी पंतप्रधानांच अभिनंदन
  • पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी जाऊ नये
  • रक्ताची दलाली बोफर्समधून काँग्रेसच्या रक्तात आली आहे
  • रेसकोर्सवर वॉर म्युझियम करा
  • हिम्मत असेल तर भेंडी बाजारावर आयकराच्या धाडी टाकून दाखवा
  • आरक्षण हा मराठ्यांचा न्यायहक्क आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे
  • शरद पवारांची अॅट्रासिटीबाबत 'ग्यानबा तुकाराम' भूमिका
  • व्यंगचित्राचा वाद विनाकारण पेटवला, माता भगिनींचा अपमान करणारी शिवसैनिकांची औलाद नाही
पुढील बातमी
इतर बातम्या