17 डिसेंबर आंदोलनाचा! मविआ महामोर्चा विरुद्ध भाजपचे आंदोलन

महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय रण पेटलंय. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्या, शनिवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भाजप 'माफी मांगो' आंदोलन करणार आहे.

भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे. मविआच्या मोर्चाविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपने आधी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजप करत आहे, असं टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडलं.

नाना पटोले म्हणाले की, 'राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकांची दादागिरी वाढली आहे. राजरोसपणे धमक्या देण्याचे प्रकारही वाढले आहेत. राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार प्रसाद लाड यांनी महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार हे महापुरुषांचा व त्यांच्या कार्याचा अपमान करणारेच होते, त्यात दुमत नाही. पण भाजपच्या एकाही नेत्याने या वाचाळवीरांवर कारवाई केली नाही व माफी मागण्याचे सौजन्यही दाखवले नाही.  


हेही वाचा

"केंद्राचे इशाऱ्याचे अग्निबाण फुसके", चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर सामनातून आगपाखड

१९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, सीमाप्रश्नावर मांडणार ठराव

पुढील बातमी
इतर बातम्या