मराठा अारक्षण अांदोलनाला हिंसक वळण; मानखुर्द, कळंबोलीत वाहने पेटवली

मुंबई अाणि परिसरात मराठा आंदोलन शांततेत सुरू असताना मानखुर्द अाणि कळंबोलीत मात्र अांदोलनाला हिंसक वळण लागलं अाहे.  मानखुर्दमध्ये पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने चिडलेल्या आंदोलकांनी बेस्ट बस पेटवून दिली. तर कळंबोलीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवत त्यांच्या तीन गाड्या जाळल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, बीडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आंदोलकांनी दगडफेक केली अाहे. अांदोलकांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केल्याने राज्यातील भाजपा नेत्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मानखुर्दमध्ये बस पेटवली

मुंबई, नवी मुंबई अाणि ठाण्यात  मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको, रेल रोको केले. तसंच अनेक दुकानदारांनी दुकान बंद करून आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. जोगेश्वरी, कांदिवली, इथं आंदोलकांनी पश्चिम द्रुतगती मार्ग अडवल्यानंतर मानखुर्दमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले. शेकडोंचा जमाव पांगवण्यासाठी पोलिस पुढे सरकले. दुपारच्या सुमारास  पोलिसांनी काही आंदोलकांना धक्काबुक्की केली. यामुळे संतप्त आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर हल्ला केला. मानखुर्दच्या मोहिते पाटीलनगरमध्ये कुर्ला आगारातील सांताक्रूझ ते नेरूळ ही ५१७ क्रमांकाची बस काही आंदोलकांनी पेट्रोलच्या बाटल्या टाकून पेटवून दिली. सुदैवाने बसमध्ये प्रवाशी नव्हते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचत आग विझवली.

कळंबोलीत पोलिसांवर दगडफेक

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेले मराठा क्रांती मोर्चातील आंदोलक बुधवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उतरले. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुऴे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून पोलिसांनीही हवेत गोळीबार केल्यानंतर प्रकरण अजूनच चिघळले. त्यानंतर अांदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवत त्यांच्या तीन गाड्या जाळल्या.


हेही वाचा -

Live Updates - मराठा क्रांती मोर्चा: मुंबई, ठाण्यातील वाहतूक विस्कळीत


 

पुढील बातमी
इतर बातम्या