मेटेंचा ‘संग्राम’

दादर - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नशिब आजमवण्याच्या शर्यतीत आता शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे सहभागी झाले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत मेटे यांचा नवा पक्ष भारतीय संग्राम परिषद दाखल झाला आहे. नव्या पक्षाच्या संस्थापकाच्या भूमिकेत शिरलेल्या विनायक मेटे यांनी शनिवारी ‘मुंबई लाइव्ह’ कार्यालयाला भेट दिली. ‘उंगली उठाओ’ अभियानांतर्गत टीम ‘मुंबई लाइव्ह’ आणि ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांना मेटे यांनी राजकीय भान राखत उत्तरं दिली. मंत्रिपद देण्याचं वचन मोडणा-या भाजपाविरोधातली नाराजी त्यांनी लपवून ठेवली नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तबगारी आणि कार्यकुशलतेचं कौतुक करत मंत्रिपदाचं दार किलकिलतं राहील याची दक्षताही त्यांनी घेतली. ‘मराठा मूक मोर्चा’चं समर्थन करतानाच वेगळ्या विचारप्रवाहामुळे चळवळ भरकटल्याचं मतही त्यांनी मांडलं. येत्या निवडणुकीत भाजपासोबत युतीची बोलणी करताना त्यांच्याजवळ मुंबईत किमान 12 जागांची मागणी करणार असल्याची माहिती सर्वप्रथम ‘मुंबई लाइव्ह’ ला दिल्यानंतरच ते मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीसाठी रवाना झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या