का ठेवलाय त्यांनी धनुष्यबाण खाली?

मुंबई - उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. पण त्या आधीच गुरुवारी शिवसेनेतील 2 नगरसेवकांनी आणि एका माजी नगरसेवकाने धनुष्यबाण खाली ठेवत चक्क कमळच हाती घेतले. मात्र, हे तिन्ही नगरसेवक कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक असून, केवळ पक्षातील बड्या नेत्यांनी आयत्यावेळी आपल्या नातेवाईक आणि समर्थकांची वर्णी लावण्यासाठी या सर्वांचे पत्ते कापले. त्यामुळे सकाळपर्यंत मातोश्री दरबारी दस्तक देऊनही त्यांचा पत्ता कापण्याचा निर्धार पक्षाने केल्यामुळे या नगरसेवकांनी दादरमधील वसंत स्मृतीचा मार्ग पकडून भाजपात प्रवेश केला.

माजी सभागृह नेता आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे हे शिवसेनेची मुलुंडमधील ओळख होती. शिशिर शिंदे यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर प्रभाकर शिंदे यांनी मुलुंडमध्ये शिवसेना टिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु मागील निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर पक्षाने त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मागील विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्यावतीने निवडणूक रिंगणात उतरले होते. पण ते पराभूत झाले. पण आता येथील प्रभाग 106 खुला झाल्यामुळे प्रभाकर शिंदे येथून इच्छुक होते. परंतु आयत्यावेळी भाजपातून पक्षात आलेल्या अभिजित कदम याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन साकडे घातले घातले. पण शिंदे यांचे एकही न ऐकल्यामुळे एवढे दिवस भाजपाची ऑफर नाकारणाऱ्या शिंदे यांनी गुरुवारी जड अंतःकरणाने भाजपात प्रवेश केला. अभिजित कदम हे पूर्वी शिवसंग्राम संघटनेत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. तिथून ते भाजपात गेले आणि आणि शिवसेनेत आले आहेत.

लालबागमधील संजय (नाना) आंबोले यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे ते आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून इच्छूक होते. मात्र त्यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न विभागप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्याकडून सुरु होता. बुधवारी रात्री उशिरापर्यंत नाना आंबोले हे मातोश्रीवर तळ ठोकून होते. पण त्यांचे ऐकून न घेता अजय चौधरी यांनी नाना आंबोले यांचे अस्तित्व संपण्यासाठी सिंधुताई मसुरकर यांचे नाव निश्चित केले. आंबोले आणि चौधरी यांच्यात विस्तव जात नसून, त्यामुळेच अखेरच्या क्षणाला त्यांनी भाजपात प्रवेश केला. आपण चौधरी यांच्या जाचाला कंटाळून भाजपाची साथ पकडली.

मानखुर्द मधील प्रभाग 144 हा महिला आरक्षित असल्यामुळे स्थानिक नगरसेवक दिनेश (बबलू) पांचाळ यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. त्यानुसार त्यांनी बायकोचा प्रचारही सुरु केला. पण आयत्यावेळी खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी मयेकर-शेवाळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यामुळे पांचाळ यांना भाजपाचा मार्ग धरावा लागला.

पुढील बातमी
इतर बातम्या