सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या दुर्गेचा अर्ज बाद, मनसेच्या सुधाकर तांबोळीची माघार

मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीत १० जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणात उतरले असून युवा सेनेचे उमेदवार साईनाथ दुर्गे यांचा अर्ज बाद ठरला आहे. पाच वर्षांपूर्वी परीक्षा नियंत्रकावर शाई फेकल्याचा आणि त्यासाठी पाच वर्षांची शिक्षा भोगल्याची कारणे देत त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. दुर्गे यांचा अर्ज बाद झाल्याने महापालिका सभागृहनेते यशवंत जाधव यांचे चिरंजीव निखिल हे युवासेनेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं समजतं. तर दुसरीकडे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या मनसेच्या सुधाकर तांबोळी यांनीही आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे.

युवा सेनेचे १० उमेदवार निवडणूक रिंगणात

येत्या २५ मार्च होणाऱ्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी युवा सेनेचे दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत मनसेने माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६२ हजार ५५९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी झालेल्या युवासेनेचे पारडे जड आहे. युवासेने मागील निवडणुकीत दहा पैकी आठ जागा जिंकल्या होत्या. परंतु यंदा युवा सेनेपुढे मनसेचे आव्हान नसून अभाविप मोठ्या ताकदीने रिंगणात उतरली आहे. त्यामुळे अभाविप आणि युवा सेना आमने सामने आहेत.

साईनाथ दुर्गे यांच्या अर्जावर अभाविपच्या सदस्याने आक्षेप नोंदवला होता. त्यानुसार त्यांचा अर्ज बाद ठरवला गेला. परंतु, याची कल्पना युवा सेनेला असल्याने त्यांनी निखिल जाधव यालाही डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला होता. त्यामुळे दुर्गेंचा अर्ज बाद झाल्याने निखिल जाधव याला युवा सेनेच्या पॅनेलमध्ये घेण्यात आलं आहे.

मनसेची माघार, तरीही बंडखोरी

या सिनेट निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्यानंतरही पक्षाच्या विद्यार्थी सेनेने मात्र बंडखोरी करत अर्ज भरले होते. यामध्ये माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांच्यासह संतोष गांगुर्डे आणि संतोष धोत्रे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, यांच्यापैंकी सुधाकर तांबोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गांगुर्डे आणि धोत्रे हे अजूनही निवडणूक रिंगणात उभे आहेत.

निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार

  • खुला प्रवर्ग : ३६
  • महिला प्रवर्ग : ०६
  • अनुसूचित जाती : ११
  • अनुसूचित जमाती : ०४
  • भटक्या- विमुक्त : ०४
  • इतर मागसवर्गीय : ०७
पुढील बातमी
इतर बातम्या