म्हाडाच्या सोडतीची प्रतिक्षा संपणार

मुंबई - मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांचे डोळे म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडतीकडे लागले आहेत. घरांच्या सोडतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार याचीच त्यांना प्रतिक्षा आहे. अशा इच्छुकांसाठी खुशखबर आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील घरांची सोडत फुटणार असून, या सोडतीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे. अंदाजे 700 घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान म्हाडाच्या सोडतीच्या इतिहासातील ही सर्वात कमी घरांची सोडत असणार आहे.

सोडतीसाठी मंडळाकडे पुरेशी घरे नसल्याने यंदाची सोडत होणार नसल्याची चर्चा आहे. मात्र यंदा सोडत होणार असे सांगत लाखे यांनी ही चर्चा खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई मंडळाकडून सोडतीसाठी उपलब्ध होऊ शकतील अशा घरांची माहिती घेण्याचे काम जोरात सुरू असून, आतापर्यंत अंदाजे 650 घरे सोडतीसाठी उपलब्ध झाली आहे. या घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम सुरू आहे. तर घरांचा हा आकडा आणखी फुगवत किमान 700 घरांची सोडत काढण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. दरम्यान 2008 पासून दरवर्षी मुंबई मंडळाकडून 31 मे रोजीच सोडत काढण्याची परंपरा सुरू झाली असून, 2015 पर्यंत ही परंपरा कायम होती. 2014 मध्ये केवळ आचारसंहितेमुळे सोडत पुढे ढकलावी लागली होती. मात्र 2016 मध्ये म्हाडाला सोडतीसाठी घरेच मिळत नसल्याने ही घरे शोधण्यात वेळ गेला नी सोडत लांबल्याने ही परंपराही खंडित झाली.

यंदाही मे महिन्यात सोडत काढण्याचे मंडळाने जाहीर केले. पण त्यादृष्टीने तयारी न झाल्याने, घरे न मिळाल्याने सोडत रखडल्याचे चित्र आहे. पण लाखे यांनी मात्र सोडत निघणार आणि त्यादृष्टीने तयारी सुरू असून, मे मध्येच सोडत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे सोडत थोडी पुढेमागे होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या