दाऊदच्या त्या हॉटेलवर टॉयलेट नाही टॉवर, चक्रपाणींच्या मनसुब्यांवर पाणी

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या भेंडी बाजारातील हॉटेलची जागा खरेदी करून तिथे एक भव्य शौचालय बांधण्याच्या अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी स्वामी यांच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. आता तिथे शौचालय नाही, तर टॉवर बनणार आहे. कारण दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील जप्त करण्यात आलेल्या तिन्ही संपत्ती सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने सर्वाधिक बोली लावून खरेदी केल्या आहेत. 

मंगळवारी सकाळी चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबर्सच्या इमारतीत ही लिलावाची प्रक्रिया पार पडली. दाऊदच्या मुंबईतील तिन्ही मालमत्ता विकल्या गेल्याच्या वृत्ताला सफेमा अधिकारी पी. सेल्व्हन यांनी दुजोरा दिला आहे. 

या तीन मालमत्तेचा लिलाव

डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस प्रत्येकी साडे तीन कोटींना तर होटल रौनक अफ्रोझ हे तब्बल साडे चार कोटी रुपयांना विकले गेल्याचे समजते. या प्रत्येक मालमत्तेसाठी एक मूळ किंमत ठरवण्यात आली होती. मात्र मूळ किंमतीच्या तब्बल तीपटीने त्याची मालमत्ता विकल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

एसबीयूटी ट्रस्टची सर्वाधिक बोली

महसूल विभागाच्या सफेमा कायद्याखाली जप्त केलेल्या दाऊदच्या तीन मालमत्तेसाठी मंगळवारी चर्चगेट येथील आयएमसीमध्ये लिलाव झाला. या लिलावादरम्यान प्रत्येक मालमत्तेसाठी एसबीयूटी ट्रस्टने सर्वाधिक बोली लावल्याचे समोर आले आहे. ही लिलाव प्रक्रिया सार्वजनिक लिलाव, ई लिलाव आणि बंद लिफाफ्याच्या पद्धतीने पार पडली.

दाऊदच्या रौनक अफ्रोझ हॉटेलसाठी मी तब्बल 2 कोटींची बोली लावली होती. ई-लिलावात माझी बोली जास्त होती. पण जेव्हा बंद लिफाफे उघडले गेले, तेव्हा एसयूबीटीची बोली जास्त होती, त्यांनी तब्बल 4 कोटी 52 लाखांची बोली लावली होती. अजूनही हॉटेल रौनक अफ्रोझसाठी मी सेकंड बिडर होतो. त्यामुळे मी आशा सोडली नव्हती.

- भूपेंद्र भारद्वाज वकील आणि बिल्डर

भेंडीबाजार परिसराचा समूह पुनर्विकास सैफी बुऱ्हाणी ट्रस्टकडून केला जात आहे. ज्या इमारतींचा पुनर्विकास सैफी बुऱ्हाणी करत आहे त्या परिसरातच दाऊदची ही मालमत्ता आहे. त्यामुळे ही मालमत्ता खरेदी करत या मालमत्तेचा पुनर्विकासात समावेश करण्याचा बुऱ्हाणी ट्रस्टचा मानस होता. त्यामुळेच बुऱ्हाणी ट्रस्टने भेंडीबाजारमधील दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी पुढाकार घेत त्यासाठी निविदा भरली होती. त्याकरता एसयूबीटीने बाजी मारली आणि आता या जागेवर टॉवर उभारणार. 

पुढील बातमी
इतर बातम्या