26/11 स्पेशल : कसाबविरोधात साक्ष देऊनही 'ती' ओळखली जाते कसाबची मुलगी

  • मानसी बेंडके
  • समाज

२६/११... मुंबईकरांच्या आयुष्यातील काळा दिवस. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई हादरली ती गोळ्यांच्या आवाजानं. याच दिवशी समुद्र मार्गानं मुंबईत घुसून १० दहशतवाद्यांनी निष्पापांचा जीव घेतला. यात मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी शहीद झाले. कोणीही न विसरू शकणाऱ्या या घटनेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात निष्पापांचा बळी घेणाऱ्या कृरकर्मा अजमल कसाबला तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन पकडलं. कसाब हा एकमेव दहशतवादी होता ज्याला पोलिसांनी जिवंत पकडलं होतं. पण याच कृरकर्मा कसाबला फासावर पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती देविका रोटावन या नऊ वर्षांच्या मुलीनं.

२६/११ हल्ल्यातल्या पिडितांपैकीच एक देविका रोटावन. हसण्या-खेळण्याच्या वयात देविकानं खूप काही सोसलं. २६/११ च्या घटनेनंतर तिचं आयुष्य पूर्णत: बदलून गेलं. गेल्या १० वर्षांपासून ती जगण्यासाठी संघर्ष करत आहे. तिचा संघर्ष जाणून घेण्यासाठी आम्ही तिला भेटलो. तिची कहाणी ऐकून अभिमान तर वाटलाच, पण तिला मिळालेल्या वागणुकीची खंतही जाणवली. जाणून घ्या तिचा संघर्ष तिच्याच शब्दांमध्ये...

'एका गोळीनं बदललं आयुष्य'

26 नोव्हेंबर 2008... हा दिवस मी कधीच विसरू नाही शकत. या घटनेनंतर फक्त माझंचं नाही तर माझ्या कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलं. 26/11 हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही ही घटनेनं माझ्या मनात घर केलं आहे. 26/11 चं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की अंगावर अक्षरश: काटा येतो.   

मला चांगलं आठवतं, पुण्याला भावाच्या घरी जायचं होतं. खूप उत्साही आणि आनंदी होतो. पण अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मी, माझा भाऊ आणि वडिल आम्ही वांद्र्याहून सीएसएमटीला पोहोचलो. संध्याकाळची वेळ होती. सीएसएमटी स्टेशनच्या 12 क्रमांकाच्या प्लेटफॉर्मवर एक्स्प्रेसची वाट पाहत होतो. माझ्या भावाला टॉयलेटला जायचं होतं तर तो टॉयलेटला गेला. थोड्या वेळात धडाम करून एकच आवाज झाला. लोकं सैरावैरा पळायला लागली. नक्की काय झालं ते कळतच नव्हतं.

माझ्या वडिलांनी माझा हात धरला आणि गर्दीसोबत त्यांनीही पळण्याचा प्रयत्न केला. पण अचानक मी कोसळली. मला खूप वेदना व्हायला लागल्या. तितक्यात माझी नजर समोर गेली. समोर एक दहशतवादी होता जो अंधाधुंद गोळीबार करत होता. जिथे नजर जाऊल तिथे तो गोळीबार करत होता. सीएसएमटी स्टेशन अक्षरश: रक्तानं माखलं होतं. लहान मुलं, वृद्ध कोणालाही तो सोडत नव्हता. लोकं रडत होती, किंचाळत होती आणि तो हसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान होतं.

काही वेळानं मी बेशुद्ध पडली. सुदैवानं माझ्या वडिलांना गोळी लागली नाही. पण त्यांचं शर्ट रक्तानं माखलं होतं. मला शुद्ध आली तेव्हा हॉस्पीटलमध्ये होते. हॉस्पीटलमध्ये देखील गोंधळ होता. जखमी झालेल्या काहींना कामामध्ये आणलं होतं. मी खूप घाबरले होते. वडिलांना आणि भावाला समोर बघून मला रडूच कोसळलं. पायाला गोळी लागल्यानं वेदना तर होत होत्या. पण माझे वडिल आणि भाऊ सुखरूप असल्याचं पाहून जीवात जीव आला. पुढच्या उपचारासाठी कामामधून मला जे. जे. रुग्णालयात आणलं.

'भावाची दयनीय अवस्था न बघवणारी' 

जे. जे. हॉस्पीटलमध्ये मी जवळपास एक-दीड महिना होती. माझ्या पायावर सहा शस्त्रक्रिया झाल्या. या दरम्यान आणखी एक संकट आमच्यासमोर उभं राहिलं. माझ्या भावाच्या गळ्यात गाठ झाली. जे.जे.मध्ये तो माझ्या सोबत असायचा. माझ्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे तोच ड्रेसिंग करायचा. त्यावेळी जे.जे.मध्ये इतरही जखमी होते. त्यांनीही त्याला ड्रेसिंग करण्यासाठी विनंती केली. 

माझ्या भावानं मोठ्या मनानं त्यांचं ड्रेसिंग करण्यास होकार दिला. पण ड्रेसिंग करताना नाही तो ग्लब्ज घालायचा नाही मास्क. त्यामुळे त्याला इन्फेक्शन झाले. इन्फेक्शनमुळे त्याच्या गळ्यात गाठ झाली. मी रुग्णालयात होती. त्यात त्याची अशी अवस्था. नेमकं काय करावं कळत नव्हतं. अखेर डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करून गाठ काढली. पण इन्फेक्शनमुळे त्याला कुबड आलं. त्याचं पाठिचं हाड बाहेर निघालं. जर मला त्यादिवशी गोळी लागली नसती तर हे सर्व झालंच नसतं.

'कसाबविरोधात लढा देण्याचा ठाम निर्णय' 

जे जे हॉस्पीटलमध्ये उपचार घेऊन आम्ही आमच्या गावी राजस्थानला गेलो. राजस्थानला असताना आम्हाला पोलिसांचा फोन आला. पोलिसांनी माझ्या वडिलांना विचारलं साक्ष देणार का? मी कसाबला पाहिलं होतं. त्याचं शैतानी रूप मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यानं इतक्या लोकांचे प्राण घेतले. त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हाच विचार करून आम्ही कसाबविरोधात साक्ष द्यायचं ठरवलं.

माझ्या पायाची जखम अजून भरली नव्हती. कुबड्या घेऊन मी कोर्टात गेली. कोर्टात सांगितल्यानुसार मी शपथ घेतली. माझ्यासमोर तिघा जणांना उभं करण्यात आलं. तिघांपैकी मला त्या दहशतवाद्याला म्हणजेच कसाबला ओळखायचं होतं. तिघांमध्ये साम्य होतं. तरीही तिघांमधून त्या नराधमाला ओळखलं. कसाब मान खाली घालून उभा होता. मला ऐवढा राग येत होता की कुबड्या फेकाव्यात आणि त्याला मारावं, असं वाटत होतं. पण मी तसं करू शकत नव्हते.

'देशासाठी लढण्याची मोठी शिक्षा'

एका गोष्टीचा मला आणि माझ्या वडिलांना अभिमान होता तो म्हणजे, देशासाठी आम्ही काही तरी करू शकलो. त्यावेळी नातेवाईकांनी, लोकांनी आमचं खूप कौतुक केलं. पण एक वर्ष उलटल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णत: बदलली. 26/11 या घटनेच्या आधी आम्ही खूप आनंदी होतो. माझ्या वडिलांचा ड्रायफ्रुटचा व्यवसाय होता. पण कसाबविरोधात कोर्टात साक्ष दिल्यानंतर लोकांच्या मनात भिती निर्माण झाली. दहशतवादी तुमच्या दुकानात गोळीबार करतील किंवा बॉम्बस्फोट करतील, अशी काहिंना भिती होती. माझ्या वडिलांना कोणी माल द्यायला तयार नव्हतं. माझे वडिलं त्यांच्या दुकानावर माल आणायला जायचे तेव्हा त्यांना माल देण्यास नकार दिला जायचा. अशामुळे आमचा व्यवसाय बंद झाला.

ऐवढंच काय नातेवाईकांनी देखील आमच्याकडे पाठ फिरवली. नातेवाईकांनी देखील भितीपोटी आमच्यापासून लांब राहणं पसंत केलं. आजही आम्ही गावी गेलो की कुणा नातेवाईकाकडे नाही तर परवडेल अशा हॉटेलमध्ये राहतो.

यासर्वात माझं शैक्षणिक नुकसान देखीलं झालं. कसाबविरोधात साक्ष दिल्यानं मला कुठल्याच शाळेत प्रवेश मिळत नव्हता. पण एका संघटनेच्या मदतीनं मला सातवी इयत्तेत प्रवेश मिळाला. शाळेत देखील मला खूप संघर्ष करावा लागला. पण मी हिम्मत हारली नाही.

'संकटांचा सामना केला'

संकटं काही संपता संपत नव्हती. देवानं जणू माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. मी टीबी या आजारानं ग्रासली. टीबीच्या उपचारासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही अनेकांकडे मदत मागितली. लोकांनी मदत केली. पण त्यामध्ये उपचाराचा खर्च भागत नव्हता. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्वीट केलं. पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. दिल्लीतून एका अधिकाऱ्यानं फोन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही त्यांना पत्र लिहलं. माझ्या वडिलांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले त्यानंतर कुठे आम्हाला आर्थिक मदत मिळाली.

'कसाबची मुलगी संबोधली जाते याची खंत'

गेल्या 10 वर्षांपासून मी आणि माझ्या कुटुंबानं खूप काही सोसले. माझ्या देशाच्या नागरिकांना अमानुषपणे मारणाऱ्या कसाब विरोधात मी उभी राहिले. पण माझ्या पाठिशी का नाही कुणी उभं राहिलं? कसाबला माझ्या साक्षिनंतरच फासावर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तरीही मला कसाबची मुलगी म्हणून संबोधलं जातं. लोकं मला असं का बोलतात हे मला माहीत नाही. पण त्यांचं हे वाक्य कसाबच्या त्या गोळीपेक्षाही अधिक वेदनादायी आहे. लोकं आमच्याशी कशीही वागली तरी मी आणि माझे कुटुंब देशासाठी लढले आणि पुढेही लढत राहू.

'आयपीएस ऑफिसर होणार'

मला मोठी झाल्यावर आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे. माझ्या देशाविरोधात क्षडयंत्र रचणाऱ्या दहशतवाद्यांना तर मिटवायचं आहेच. पण त्यासोबत मला त्यांच्या मास्टरमाईंडला देखील धडा शिकवायचा आहे.

गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही खूप काही सोसलं. त्यातून खूप काही शिकलोही. 26/11 च्या घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली असली तरी आमच्या जखमा आजही ताज्या आहेत आणि कायम राहतील. 

पुढील बातमी
इतर बातम्या