जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई ५० व्या क्रमांकांवर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

मुंबईची सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच असल्याचं आता दिसून येत आहे. जगातल्या 60 सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 50 व्या स्थानावर आहे. डेन्मार्कच्या राजधानीचं शहर असलेल्या कोपनहेगनने जगातलं सर्वांत सुरक्षित शहर असल्याचा मान मिळवला आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जगातील 60 सर्वांत सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. कोपनहेगनला 100 पैकी 82.4 गुण मिळाले. तर 82.2 गुण मिळवून टोरांटो दुसऱ्या स्थानावर राहिलं आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला या यादीत स्थान मिळालं आहे. सुरक्षित शहरांच्या यादीत दिल्ली 48 व्या, तर मुंबई 50 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानातल्या कराची या शहराला 59 वं स्थान मिळालं आहे. 

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट दर दोन वर्षांनी सुरक्षित शहर निर्देशांक जाहीर करते. या उपक्रमाचं यंदा चौथं पर्व आहे. यापूर्वी अव्वल ठरलेल्या टोकियो, सिंगापूर, ओसाका आदी शहरांना मागे टाकून या वेळी कोपनहेगनने यात बाजी मारली. शहरांच्या सुरक्षिततेचे पाच महत्त्वाचे स्तंभ असलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला होता. त्यात डिजिटल, आरोग्य, पायाभूत सुविधा, वैयक्तिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय सुरक्षितता या पाच मुद्द्यांचा समावेश आहे.सुरक्षिततेच्या 76 संकेतांचा विचारही यादी निश्चित करताना करण्यात आला आहे.  

10 सर्वाधिक सुरक्षित शहरं 

1. कोपनहेगन

2. टोरांटो

3. सिंगापूर

4. सिडनी

5. टोकियो

6. अॅमस्टरडॅम

7. वेलिंग्टन

8. हाँगकाँग

9. मेलबर्न

10. स्टॉकहोम

पुढील बातमी
इतर बातम्या