आई-वडिलांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडाल, तर कारवाई होईल!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

आई-वडिलांना म्हातारपणी त्रास देणं, त्यांना घरातून काढून टाकणं असे प्रकार देशात वाढत असून हे प्रकार रोखण्यासाठी लवकरच सरकार कठोर कायदा करणार आहे. त्यामुळे यापुढे जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

सामाजिक न्यायमंत्र्यांची माहिती

ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगला जावा, त्यांचं जीवन सुसह्य व्हावं या संदर्भात भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना लवकरच सरकार कठोर कायदा करण्याचा विचार करत असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. दरम्यान, यावेळी वयाचा दाखलाही विना हेलपाटा मिळावा, त्यांना ओळखपत्र मिळावं, विधवा महिलांना शासनाची मदत मिळावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, निवृत्तीवेतन मिळावे आणि रुग्णालयांत स्पेशल सेल असावा यांसारख्या अन्य मुद्द्यांवर सर्वपक्षीय आमदारांनी शासनाचं लक्ष वेधलं.

अन्यथा वाढ थांबेल  

जे सरकारी नोकरीत आहेत आणि आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील तर त्यांची वेतनवाढ देखील थांबवण्यात येईल, अशी माहिती बडोले यांनी सभागृहात दिली. तसेच, जी मुलं आपल्या पालकांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र

जेष्ठांना वयाचे दाखले वेळेत मिळावेत, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील. वयाचा दाखला विना हेलपाटा देण्याबाबत तलाठी, ग्रामसेवकांना सूचना करण्यात येईल. तसेच महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले.

ज्येष्ठांसाठी आणखी काय?

  • उपविभागीय स्तरावर असलेल्या न्यायाधिकरणामार्फतही ज्येष्ठ दाद मागू शकतील
  • उत्पन्न वाढ होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरणाद्वारे बैठकही बोलावण्यात येईल
  • ज्या महापालिका ज्येष्ठांना सकारात्मक वागणूक देणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल
  • वृद्धाश्रमांचं अनुदान थकीत असेल, तर ते वितरीत करण्यात येईल
  • ज्येष्ठांना १२०० रुपये अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेण्यसाठी सरकार कार्यवाही करेल

पुढील बातमी
इतर बातम्या