महिला आयोगाच्या स्वतंत्र हेल्पलाईनला महिला दिनाचा मुहूर्त

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • समाज

महिला तस्करीमध्ये मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमधील वाढ आणि दुसरीकडे महिला तस्करीचा गंभीर प्रश्न यावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मुंबईत ऐरणीवर आला होता.

सात महिन्यांनंतर सापडला मुहूर्त!

महिला तस्करी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय सात महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार स्वंतत्र हेल्पलाईन सुरू करण्याचं काम पूर्ण झालं असून आता या हेल्पलाईनला मुहूर्त मिळाला आहे. महिला दिनी वांद्र्याच्या म्हाडा भवनातील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात या स्वतंत्र हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती रहाटकर यांनी दिली आहे.

पीडित महिलांना होणार फायदा

महिला तस्करी, कौटुंबिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचार पीडित महिलांना या हेल्पलाईनवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. या तक्रारीची दखल घेत पीडुत महिलेला आवश्यक ती मदत करत तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या हेल्पलाईनच्या माध्यमातून होणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तात्काळ पीडित महिलेला आयोगाकडून आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. तर तिचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. त्यासाठी हेल्पलाईन कक्षात प्रशिक्षित समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ही देशातील अशा प्रकारची पहिली हेल्पलाईन असल्याचा दावा रहाटकरांनी केला आहे.

कालांतराने २४ तास सुरू राहाणार हेल्पलाईन

महिला दिनी ८ मार्चपासून सुरू होणारी ही स्वतंत्र हेल्पलाईन सुरूवातील कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. तर पुढे ही सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या