एलबीडब्ल्यू आणि अंपायर...

मुंबई - पूर्वी अंपायर कंबरेत वाकून डोळे साधारणपणे स्टंपच्या पातळीत आणायचे. आता मात्र अंपायर ताठ उभे राहतात. त्यामुळं चेंडूची दिशा, स्पिन आणि गोलंदाजाच्या हातातून सुटल्यापासून फलंदाजापर्यंत जाण्याचा जो प्रवास असतो, त्याबद्दल तितकासा अचूक अंदाज येत नाही. चेंडू हातभर वळणाऱ्या खेळपट्ट्यांवर फलंदाजाला एलबीडब्ल्यू ठरवताना चुकीचा निर्णय दिला जाण्याचे प्रकार वाढल्याचं हे एक महत्त्वाचं कारण असावं, असं मत माजी अंपायर माधवराव गोठोस्कर यांनी व्यक्त केलंय.

अंपायर म्हणून खेळांडूचा आदर मिळवणाऱ्यांच्या यादीत गोठोस्करांचं नाव खूपच वर आहे. ‘गोठोस्कर सरांनी ठरवलंय, मग मी बादच असणार,’ ही दस्तरखुद्द सुनील गावसकर यांनी त्यांना दिलेली पावती बरंच काही सांगून जाते. १९७३मध्ये गोठोस्करांनी अंपायर म्हणून पहिल्या कसोटीत काम पाहिलं होतं. तेव्हापासून आजपर्यंतच्या अनेक किश्श्यांचं चालतं-बोलतं भांडारच असलेल्या गोठोस्कर यांनी नुकतीच ‘मुंबई लाइव्ह’च्या कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यानच त्यांनी अंपायरनं उभं राहण्याची बदललेली पद्धत आणि त्यामुळं निर्णय चुकण्याच्या या शक्यतेवर बोट ठेवलं.

क्रिकेटचा एनसायक्लोपिडिया असलेल्या गोठोस्करांनी या वेळी क्रिकेटच्या बदलत्या स्वरुपाबद्दलही मतं व्यक्त केली. होम अॅडव्हांटेजच्या नावाखाली प्रत्येक देश स्वतःच्या सोयीच्या खेळपट्ट्या बनवतोय. हे असंच सुरू राहिलं, तर रणजी स्पर्धेत जसं त्रयस्थ जागी सामने खेळवले जातायत, तसंच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांसाठीही होण्याचा दिवस लांब नाही असं भाकितही त्यांनी वर्तवलं.

अंपायर म्हणून कौल देताना सगळ्यात मोठी कसोटी लावणारा गोलंदाज कोण?, या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, चंद्रशेखर... तो कुठला चेंडू टाकणार आहे हे त्यालाही माहिती नसायचं असं गमतीत सांगताना त्यांनी ‘अंपायर म्हणून त्यानं टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर डोळ्यांत तेल घालून बघावं लागायचं,’ अशी पुस्तीही जोडली.

पुढील बातमी
इतर बातम्या