रवी शास्त्री यांनी घेतले एका चेंडूत दोन बळी

ज्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याचप्रमाणे या खेळाशी जोडले गेेलेले प्रशासनही अनिश्चित रणनीतींवर बेतलेले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून आर श्रीधर यांच्या नावाची घोषणा झाली आणि क्रिकेट प्रशासनाच्या अनिश्चित 'मु्व्ह'चा पुन्हा एकदा प्रत्यय आला. यानिमित्ताने  भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका चेंडूत दोन बळी घेण्याची किमया साधली.  

राहुल द्रविड आणि झहीर खानचा पत्ता कट

अगदी आताआतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूून 'द वॉल' राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून 'झॅक' अर्थात झहीर खानची निवड निश्चित मानली गेली होती. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा संचालक अशी जबाबदारी याआधी पार पाडणाऱ्या रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयच्या वतीने  झाली आणि चित्र पालटलं. माजी क्रिकेटपटू संजय बांगरची सहाय्यक प्रशिक्षकपदी वर्णी लागली. रवी शास्त्री यांच्या शिफारशीमुळेच हे घडले. श्रीधर आणि भरत अरुण या क्रिकेटजगतात तुलनेने अपरिचितांची अनुक्रमे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लॉटरी लागली, तीसुद्धा रवी शास्त्री यांच्यामुळेच. 

रवी शास्त्रीची फिरकी

फलंदाज आणि फिरकी गोलंदाज म्हणून लौकिक कमावणाऱ्या रवी शास्त्री यांनी आपल्या फिरकीचीच चुणूक दाखवून दिली. भरत अरुण आणि एच श्रीधर यांच्या नावाचा आग्रह रवी शास्त्री यांनी पहिल्यापासून धरला होता. मात्र, मुख्य प्रशिक्षकपदाच्या पॅनेलमधले सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण हे दिग्गज द्रविड आणि झहीरच्या नावावर ठाम राहिले. आधी मुख्य प्रशिक्षकपद स्वतःकडे खेचण्याची खेळी रवी शास्त्री यांनी केली. उत्तम प्रशासक असलेल्या शास्त्री यांच्यासाठी हे अवघड नव्हते. त्यातच राहुल द्रविडने आपण परदेशात भारतीय संघासोबत प्रवास करणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे शास्त्रीचे फावले. द्रविडला रन आउट केल्यानंतर झहीरला क्लीन बोल्ड करण्यातही शास्त्रींना कष्ट पडले नाहीत. 

आव्हान मोठे...

रवी शास्त्री यांनी आपल्याला हव्या तशा पद्धतीने गोष्टी घडवून आणल्या आहेत. पण आता त्यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी उत्तम ट्युनिंग, जबरदस्त प्रशासकीय समज आणि क्रिकेटचा प्रॅक्टिकल अनुभव या भांडवलावर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान झाले आहेत. आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष त्यांच्याकडे खिळलेले असणार आहे. भविष्यातल्या यशात त्यांना वाटेकरी मिळतील, पण दुर्दैवाने अपयश आल्यास त्याचे खापर अरुण भरत आणि एच श्रीधर अगदी एकट्या विराट कोहलीवरही फोडता येणार नाही, हे शास्त्री जाणून आहेत.    

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या