मुंबईत वाढताहेत महिला बाॅडीबिल्डर्स- सुनीत जाधव

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

बाॅडीबिल्डींगची आजच्या तरूणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. युवा पिढीला फिटनेसचं महत्त्व उमगल्याने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फिट राहण्याचा प्रयत्न करत आहे. यांत पुरूषांसोबत महिलांचं प्रमाणही चांगलं आहे. मात्र जेव्हा बाॅडीबिल्डींगमध्ये करिअर करण्याचा प्रश्न येतो तेव्हा पुरूषांच्या तुलनेत महिला बऱ्याच मागे राहतात. याउलट परदेशात पुरूषांच्या बरोबरीने महिला बाॅडीबिल्डींग स्पर्धा गाजवत आहेत. त्यामुळे भारतीय महिलांनीही बाॅडीबिल्डींगमध्ये करिअर करण्यासाठी पुढे यावं. मुंबईत हळुहळू बाॅडीबिल्डींगमध्ये महिलांचं प्रमाण वाढतंय, असं मत भारत श्री सुनीत जाधवने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केलं.

दृष्टीकोनात बदल हवा

बाॅडीबिल्डींग स्पर्धा आयोजित केल्यावर बाॅडीबिल्डरचं पिळदार शरीर बघण्यासाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणात पुरूष प्रेक्षक या स्पर्धांना येतात. तेवढ्याच प्रमाणात महिला प्रेक्षकही येतात. पण स्टेजवरील स्पर्धकांमध्ये महिला बाॅडीबिल्डरचा अभाव जाणवतो. प्रोफेशनल महिला बाॅडीबिल्डरची कमतरता असल्याने त्यांच्यासाठी अत्यंत मर्यादीत प्रमाणात स्पर्धा आयोजित होतात.

कमी कपड्यांची अॅलर्जी नको

बाॅडीबिल्डींग स्पर्धा म्हटलं की कमी कपडे घालून स्टेजवर जावं लागतं. आपल्याकडील महिलांची त्यासाठी तयारी नसल्याने कदाचित करिअर म्हणून त्या बाॅडीबिल्डींगचं प्रोफेशन निवडत नसाव्यात. पण जसजसा त्यांच्या आणि समाजाच्या बघाण्याच्या दृष्टीकोनात बदल होईल, तसतसा या स्पर्धांमध्ये महिला बाॅडीबिल्डरचा सहभाग वाढेल. मुंबईत हळुहळू का होईना, बाॅडीबिल्डींगमध्ये महिलांचं प्रमाण वाढतंय.

कुटुंबाकडून प्रोत्साहन हवं

महिलांनी चार भिंतीत अडकून राहण्याची गरज नाही. त्यांनी मनातल्या इच्छा कुटुंबापुढे बोलून दाखवल्या पाहिजेत. कुटुंबानेही या महिलांना कुठल्याही क्रीडा प्रकारात नाव कमावण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावरच काही महिला बाॅडीबिल्डींगमध्ये नाव कमावत आहेत. त्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे.

व्यायामात तज्ज्ञांचं मार्गदर्शन हवंच

व्यायाम करताना अपघात होतात. शारीरिक दुखापतींना सामोरं जावं लागतं, अशी व्यथा अनेक तरूण मांडतात. त्यावर उत्तर असं की बाॅडीबिल्डींग करायची असल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन हवंच. उत्साहात येऊन कुणीही व्यायाम करू नये, हा क्रीडा प्रकार खर्चिक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता आहे, त्यांनीही मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करू नये. कारण चुकीच्या व्यायामामुळे वा डाएटमुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

मेहनतीच्या जोरावर यश

मला लहानपणापासून व्यायामाची आवड होती. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काही कठीण प्रसंग आले. माझे बाबा सरकारी कर्मचारी आहेत. दोन भाऊ आणि एक बहीण असल्याने माझ्या एकट्यावर माेठा खर्च करणे त्यांच्या आवाक्याबाहेर होतं. त्यामुळे मी

जिम प्रशिक्षक म्हणून पार्टटाइम काम करून आवड जोपासली. अत्यंत मेहनतीनं आणि अपयशावर मात करत मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.

खर्चिक, पण स्थिर करिअर

बाॅडीबिल्डींग हा खूप खर्चिक खेळ आहे. त्यामुळे ज्या तरूणांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांनी पार्टटाइम काम करून ही आवड जोपासावी. त्यानंतर बाॅडीबिल्डींग स्पर्धा असो वा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करणं असो चांगले उत्पन्नही मिळवता येऊ शकते.

फिट रहा, डॉक्टरांचा खर्च वाचवा

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात फिटनेस खूप महत्वाचा आहे. व्यायामाकडे आणि योग्य आहाराकडे दुर्लक्ष झाल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे दिवसातून १ तास जरी फिटनेससाठी दिला तरी खूप आहे. असं केल्यास भविष्यात डाॅक्टरला दूर ठेवता येऊ शकतं.

आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकवायचं आहे

आतापर्यंत मी दोन वेळा भारत श्री किताब पटकावला आहे. यापुढे मला आंतरराष्ट्रीय पातळीवरील विजेतेपद पटकवायचं. माझं ध्येय आणि माझ्या चाहत्यांमुळे मला नेहमीच प्रेरणा मिळते. त्यासाठी माझी तयारी देखील सुरू आहे, असं सुनीतने सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या