महापौर चषक खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी स्पोर्टस् अॅकॅडमीचा डबल धमाका

30 व्या महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष तसेच महिला गटांत महात्मा गांधी स्पोर्ट्स अॅकॅडमीने अंजिक्यपद पटकावले. तर व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वेने अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत मध्य रेल्वेचे अजिंक्यपद रोखले. भांडुपमधील कोकणनगर येथे मिनाताई ठाकरे मैदानावर ही स्पर्धा पार पडली. 

गतविजेत्या पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेवर (4-4,5-4,6-5) 15-14 असा 1 गुण आणि 40 सेकंद राखून विजय मिळवीत मुंबई महापौर चषकाचे व्यावसायिक गटाचे अजिंक्यपद पटकावले. मध्यंतराला असलेली एका गुणाची पिछाडी दुसऱ्या डावात भरून काढत पश्चिम रेल्वेने दोन्ही डावात बरोबरी साधली. 

ही कोंडी फोडण्यासाठी जादा डाव खेळवण्यात आला. या डावातील शेवटच्या आक्रमणाच्या सुरूवातीलाच पश्चिम रेल्वेच्या तेजस शिरसकरने स्ट्रेट कव्हर करीत मध्य रेल्वेच्या योगेश मोरेला केवळ 20 सेकंदात बाद केले आणि सामना पश्चिम रेल्वेच्या बाजूने झुकवण्यास सुरूवात केली. पश्चिम रेल्वेच्या अमोल जाधव, तेजस शिरसकर, दीपक माधव , मनोज पवार आणि तक्षक गौंडाजे यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. मध्य रेल्वेच्या महेश माळगे, विजय हजारे आणि दिपेश मोरेने कडवी झुंज दिली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीच्या तुफानी आक्रमणासमोर ओम समर्थचे खेळाडू निष्प्रभ ठरले आणि गतविजेत्या महात्मा गांधी स्पो.अॅकॅडमीने 25-18 असा 7 गुणांनी विजय प्राप्त करून महापौर चषकावर पुनःश्च नाव कोरले. मध्यंतराला महात्माने 5 गुणांची विजयी आघाडी घेतली होती. महात्माच्या अनिकेत पोटे, अभिजीत जाधव, हर्षद हातणकर, ऋषिकेश मूर्चावडे यांनी विजय खेचून आणला तर महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी स्पो. अॅकॅडेमीने श्री.समर्थ व्यायाममंदिरचे तगडे आव्हान 15-1 असे 5 गुणाने मोडून काढत विजेतेपद पटकावले. महात्माच्या साक्षी वाफेलकर, प्रियांका तेरवणकर आणि समिक्षा गावडे या विजयाच्या शिल्पकार होत्या. श्री. समर्थच्या साजल पाटील आणि भक्ती धांगडे  यांची झुंज अपयशी ठरली. 

पुढील बातमी
इतर बातम्या