रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई कर्नाटकशी भिडणार

41 रणजी करंडकांना गवसणी घालणाऱ्या मुंबई संघाची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल ती बलाढ्य कर्नाटकशी. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील हा सर्वात हाय-व्होल्टेज सामना मानला जात अाहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर गुरुवारपासून रंगणाऱ्या या सामन्यात रणजी करंडकाच्या इतिहासातील हे दोन सर्वात यशस्वी संघ एकमेकांशी भिडतील.

सिद्धेश लाड, पृथ्वी शाॅवर मुंबईची भिस्त

मुंबईसाठी फलंदाजीत अातापर्यंत तारणहार ठरले अाहेत ते सिद्धेश लाड अाणि युवा पृथ्वी शाॅ. सिद्धेश लाडने 10 सामन्यांत 613 धावा फटकावत मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला अाहे. 18 वर्षीय पृथ्वी शाॅने दोन खणखणीत शतकं झळकावली अाहेत. या दोघांवर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त असली तरी कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारच्या वेगवान गोलंदाजीसमोर दोघांची कसोटी लागणार अाहे.

कर्नाटकचा मयांक अगरवाल तुफान फाॅर्मात

एका त्रिशतकासह दहा सामन्यांत 1064 धावा फटकावणाऱ्या मयांक अगरवालने एकहातीपणे किल्ला लढवत अाठ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या कर्नाटकला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले अाहे. सलामीवीर रवीकुमार समर्थ अाणि मनीष पांडे हे त्याला चांगली साथ देत अाहेत. त्याचबरोबर विनयकुमार अाणि श्रेयस गोपाळ हे गोलंदाज मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

पुढील बातमी
इतर बातम्या