मुंबई उपनगर, ठाण्याचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले

चिपळूणच्या जोशी मैदानात झालेल्या राज्य अजिंक्यपद न निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे मुंबई उपनगर अाणि ठाणे संघाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. कुमार गटात मुंबई उपनगरला तर मुलींच्या गटात ठाणे संघाला विजेतेपदाने सलग दुसऱ्यांदा हुलकावणी दिली.

मुलींमध्ये ठाण्याविरुद्ध पुण्याने जेतेपद राखले

थरारक रंगलेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुणे संघाने जेतेपद राखले तरी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना ठाणे संघाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. मध्यंतराला एका गुणाची पिछाडी भरून काढत ठाण्याने दुसऱ्या डावात बरोबरी साधली. ही कोंडी फोडण्यासाठी अतिरिक्त डाव खेळवण्यात अाला, मात्र ठाणे संघाचे प्रयत्न अखेरच्या क्षणी तोकडे पडले. त्यामुळे पुण्याने १४-१३ असा एका गुणाने विजयश्री प्राप्त केला. ठाण्याच्या रेश्मा राठोडने (२.३० मि., ३.५० मि. व ४ गडी) विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पुण्याकडून प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर अाणि भाग्यश्री जाधव यांनी चमक दाखवली.

मुंबई उपनगरला सांगलीकडून धक्का

कुमार गटातील अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले, पण त्यांना सांगलीकडून १३-१५ असा २ गुणांनी पराभव पत्करावा लागला. उपनगरच्या ओमकार सोनावणेने कडवी लढत देताना धारदार आक्रमणात ७ गडी टिपले. मात्र अापल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. सांगलीकडून सौरभ अहिर, प्रथमेश शेळके, अभिषेक केरीवाले यांनी खेळ केला. कुमार गटात सांगलीच्या प्रथमेश शेळकेने तर मुलींमधे पुण्याच्या प्रियांका इंगळेने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

पुढील बातमी
इतर बातम्या