राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगर, ठाणे फायनलमध्ये

चिपळूण येथील जोशी मैदानात सुरू असलेल्या ४५ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात मुंबई उपनगरने तर मुलींमध्ये ठाणे संघाने अंतिम फेरीत धडक मारली. अाता मुंबई उपनगरचा सामना सांगलीशी अाणि गेल्या वर्षीप्रमाणे ठाणे विरुद्ध पुणे असा अंतिम सामना रंगणार अाहे.

उपनगरचा पुण्याला दे धक्का

उपांत्य फेरीत मुंबई उपनगरने पुण्याला पराभवाचा धक्का देत १५-१३ असा दोन गुणांनी विजय मिळवला. मध्यंतराला दोन्ही संघ समान स्थितीत होते. उपनगरच्या निहार दुबळे (१.५०,१.४० मि. व ६ गडी), ओमकार सोनावणे (२.५० मि., ३ मि. व २ गडी) , सत्येश चाळके (१.३० मि. व २ गडी) व अनिकेत चेंदवणकर (१.३० मि.) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात सांगलीने ठाणे संघाला १६-१५ असे पराभूत केले. ठाण्याच्या निखील वाघे (२ मि व ५ गडी) व जीतेश म्हसकर (४ गडी) यांचे प्रयत्न तोकडे पडले.

ठाण्याकडून रत्नागिरीचा धुव्वा

मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याने यजमान रत्नागिरीचा ९-४ असा १ डाव व ५ गुणांनी धुव्वा उडवला. ठाण्याच्या अश्विनी मोरे (३.५० मि व २.१० मि) , गीतांजली नरसाळे (५ मि) व दिक्षा सोनसुरकर (४ गडी) यांनी जबरदस्त खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीवर १३-७ अशी मात केली.

पुढील बातमी
इतर बातम्या