पाटकर विद्यालयाच्या मुलींची बाजी

शिवाजी पार्क - शिवाजी पार्कमधील उद्यान गणेश सेवा समिती आयोजित मुंबई, ठाण्यामधील 17 वर्षांखालील शालेय मुलामुलींच्या श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये 32 शालेय संघ तर मुलींमध्ये 19 शालेय संघ सहभागी झालेत. त्यात दादर-पूर्वेच्या दिगंबर पाटकर विद्यालयाला 42-41 अशा सलामीच्या विजयासाठी दादर-पश्चिमच्या शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुलींनी अखेरपर्यंत झुंजविले. शारदाश्रमचा पराभव टाळण्यासाठी मनाली परुळेकरनं टायब्रेकरमधील एका चढाईत दोन गुण घेऊन शर्थीचे प्रयत्न केले,पण ते व्यर्थ ठरले. तर इतर शालेय 17 वर्षांखालील मुलींच्या अन्य सामन्यात लक्ष्मी विद्यालय, बालमोहन विद्यामंदिर, प्रभादेवी महानगरपालिका शाळा, उत्कर्ष विद्या मंदिर यांनी विजय मिळवला.

शिवाजी पार्क मैदानात सुरू असलेल्या अन्य सामन्यात राजश्री टेळे आणि प्राची टेळे यांच्या अप्रतिम खेळामुळे लक्ष्मी विद्यालयानं स्वामी विवेकानंद शाळेचा 21-19 असा तर आकांक्षा घाटकरच्या अष्टपैलू खेळामुळे बालमोहन विद्यामंदिरानं हॉली क्रॉस हायस्कुलचा 60-24 असा पराभव केला. प्रभादेवी महानगरपालिका शाळेनं के. एम. एस. इंग्लिश स्कुल संघाचं आव्हान 59-16 असे संपुष्टात आणताना साक्षी जंगम आणि आचल यादव चमकल्या. उत्कर्ष विद्या मंदिरनं आरती मतकंटेच्या चढाईच्या खेळामुळे डॉ. शिरोडकर हायस्कुलवर 44-22 असा विजय मिळविला.

पुढील बातमी
इतर बातम्या