गोरेगावमध्ये प्रबोधन मुंबई टी-20 स्पर्धेला प्रारंभ

प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. गोरेगाव (प.) येथील प्रबोधन मैदान येथे स्पर्धेतील पहिली लढत डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी आणि एमआयजीसीसी यांच्यात होणार आहे. कर्नाटक स्पोर्टिंग (क्रॉस मैदान) येथे फोर्ट विजय आणि कर्नाटक स्पोर्टिंग यांच्यात दुसरी लढत रंगणार आहे. दुपारच्या सत्रात न्यू हिंदसमोर पारसी जिमखान्याचे आव्हान असेल. तर कर्नाटक स्पोर्टिंग येथे पय्याडे आणि मुंबई पोलीस जिमखाना या दोन बलाढ्य संघात लढत होणार आहे. मुंबईचे माजी कसोटीवीर लालचंद राजपूत यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी प्रबोधन गोरेगावचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, गतवर्षीचे विजेते यजमान प्रबोधन आणि उपविजेते नॅशनल सी. सी. यांना द्वितीय फेरीत थेट प्रवेश मिळाला असून यजमानांसमोर डी. वाय. पाटील आणि एम. आय. जी. यांच्यातील विजेत्यांचे आव्हान असेल. तर नॅशनलसमोर पय्याडे आणि मुंबई पोलीस यांच्यातील विजेत्यांचे आव्हान असेल. पहिल्या दिवसातील अन्य दोन विजेत्यांना 8 एप्रिलला होणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल.

एकूण दीड लाख बक्षीस रकमेच्या या स्पर्धतील अंतिम फेरीची लढत 9 एप्रिलला दुपारी दीड वाजता होईल. अंतिम विजेत्यांना रोख रक्कम एक लाखाचे तर उपविजेत्यांना 50 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. शिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला नवी कोरी मोटर बाइक मिळणार आहे. या वेळी पारितोषिक वितरणासाठी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मुंबईच्या क्रिकेट जगतातील आजी माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या