देशातील अव्वल टेनिसपटू जेव्हीपीजी मानांकन स्पर्धेत झुंजणार

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रीडा

भारतातील सर्वाधिक बक्षिस रकमेची अाणि देशातील अव्वल टेनिसपटूंचा सहभाग असलेली जेव्हीपीजी अनिरुद्ध देसाई अखिल भारतीय खुली टेनिस स्पर्धा ५ ते ११ फेब्रुवारीदरम्यान रंगणार अाहे. जुहू विलेपार्ले जिमखान्याच्या फ्लडलाइट्सवर ही स्पर्धा माजी टेनिसपटू अनिरुद्ध देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खेळवण्यात येते. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी अाणि मिश्र दुहेरी अशा पाच गटांत ही स्पर्धा खेळविण्यात येणार अाहे.

पुण्याच्या अर्जुन काढेला दुसरे मानांकन

पुरुष गटात देशातील अव्वल टेनिसपटूंचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार अाहे. भारतात सध्या सातव्या क्रमांकावर असलेला उत्तर प्रदेशचा सिद्धार्थ रावत याला पुरुष एकेरी गटात अव्वल मानांकन देण्यात अाले अाहे. पुण्याच्या २४ वर्षीय अर्जुन काढेला दुसरे मानांकन मिळाले अाहे. तर सध्याचा राष्ट्रीय विजेता दलविंदर सिंग याचाही मुख्य ड्राॅमध्ये समावेश करण्यात अाला अाहे.

महिलांमध्येही कडवी लढत

महिला एकेरीत मध्य प्रदेशच्या महक जैन हिला अव्वल मानांकन मिळाले अाहे. महक हिने यूएस अोपन ज्युनियर, विम्बल्डन अाणि अाॅस्ट्रेलियन अोपन ज्युनियर २०१७ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गतविजेत्या रिया भाटिया हिने मात्र या स्पर्धेतून माघार घेतली अाहे.

बक्षिसं किती?

पुरुष अाणि महिला एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार अाहे. उपविजेत्याला एक लाख रुपयांचा लाभ होईल. मिश्र दुहेरी, महिला अाणि पुरुष दुहेरीतील विजेत्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. तसेच संपूर्ण स्पर्धेदरम्यान 'फास्टेस्ट सर्व्ह' ही स्पर्धाही घेण्यात येणार अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या