महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत विनोद कुमारचं लखलखतं यश

व्हिनस चेस अकॅडेमी आयोजित दहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पाॅंडीचेरीच्या विनोद कुमारने (इलो 1870) इलो 1999 गुणांकनाखालील 'ब' गटाचे अजिंक्यपद पटकावले. विनोदने सर्वाधिक 8.5 गुण मिळवले. त्याला रोख 1 लाख 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर उत्कृष्ट सरासरीच्या बळावर 8 गुण मिळवलेला मुंबईचा वैभव भट स्पर्धेत उपविजेता ठरला. त्याला 80 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

वांद्रे येथील माऊंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनल सभागृहात झालेल्या या स्पर्धेत 'ब' गट इलो 1999 गुणांकनाखालील बुद्धिबळ स्पर्धेत 334 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. मुंबईच्या वैभव भटची आघाडी अभिषेक चितारीने नवव्या फेरीत त्याच्यावर मात करून हिरावून घेतली. निर्णायक दहाव्या फेरीत अभिषेक चितारीचे आव्हान विनोद कुमारने संपुष्टात आणून अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पहिल्या पटावर अभिषेक चितारी (8 गुण) विरुद्ध विनोद कुमार (7.5 गुण) यांच्यातील डावाची सुरुवात फ्रेंच बचाव पद्धतीने झाली. परंतु डावाच्या मध्याला त्याने केलेल्या चुकांचा लाभ उठवून विनोद कुमारने 46 चालीत विजय संपादन करुन प्रथम स्थानावर झेप घेतली. दुसऱ्या पटावर अरविंद के. (7.5 गुण) वि. वैभव भट (7.5 गुण) यांच्या लढतीमध्ये दोघांनीही कुठलाही धोका न पत्करता 13 व्या चालीत डाव बरोबरीत सोडवला. परिणामी वैभव भटने द्वितीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत 'ब' गटात अभिषेक चितारीने (8 गुण) तृतीय, वैभव राऊतने (8 गुण) चौथा, आंध्रप्रदेशच्या शिवा शर्माने (8 गुण) पाचवा, सौरव साहुने (8 गुण) सहावा, तामिळनाडूच्या अरविंद के. ने (8 गुण) सातवा, गौरव झगडेने (8 गुण) आठवा, तामिळनाडूच्या अरविंद स्वामीने (8 गुण) नववा आणि अभिषेक देशपांडेने (8 गुण) दहावा क्रमांक पटकावला.

पुढील बातमी
इतर बातम्या