देशाच्या सुरक्षेसाठी भारतानं ११८ चायनीज अॅप्सवर (chinese app) बंदी घातली. त्यामध्ये भारतात सर्वाधिक पसंतीच्या PUBG गेमचाही समावेश आहे. त्यामुळे पब्जी गेमला काय पर्याय आहे, याचा शोध अनेक जण घेऊ लागले. आता चिनी पब्जीप्रमाणेच भारतात FAU-G गेम लाँच होणार आहे. खिलाडी अक्षय कुमारनंच या मेड इन इंडिया गेमची घोषणा केली आहे.
भारतात FAU-G गेमची घोषणा करण्यात आली आहे. Fearless and United: Guards असं या गेमचं पूर्ण नाव आहे. हा गेम बंगळुरूतील कंपनी nCORE गेम्स रिलीज करणार आहे. अक्षय कुमार या गेमचा पहिला गेमिंग वेंचर आहे. अक्षयनं आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
"पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत चळवळीचं समर्थन करत हा अॅक्शन गेम आणताना मला खूप अभिनान वाटतो आहे. Fearless And United-Guards FAU-G. गेम्समधून मनोरंजनाशिवाय प्लेअर्सना सैनिकांना किती बलिदान द्यावं लागतं, हेदेखील समजू शकेल. या गेममधून होणाऱ्या कमाईचा २०% भाग भारत के वीर ट्रस्टला दिला जाणार आहे", असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं आहे.
GOQii चे सीईओ विशाल गोंडल हे एनकोर गेम्सचे गुंतवणूकदारही आहेत. दरम्यान हा गेम कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसंच हा गेम मोबाइल की डेस्कटॉपसाठी असेल याची माहिती देखील जाहीर केली गेली नाही.