व्हॉट्सअॅपचा रंग गुलाबी होणार अशी लिंक आलीय? लिंंकवर क्लिक कराल तर...

आपल्यापैकी बरेच व्हॉट्सअपचा वापर करतात. पण सांभाळून... व्हॉट्सअप वर आलेल्या एका लिंकमुळे तुम्ही फसवले जाऊ शकता. व्हॉट्सअॅप इंस्टंट मेसेजिंग अॅपवर सध्या एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात म्हटलं आहे की, Whatsapp आता हिरव्या रंगात नाही तर पिंक म्हणजेच गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे.

पण हा दावा करताना एक लिंक सुद्धा दिली आहे. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. तुम्ही जर या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तुमचा सगळा डेटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो.

पण सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, व्हॉट्सअॅप पिंकसंबंधी कोणतीही लिंक आल्यास तुम्ही सावध राहा. एपीके डाउनलोड लिंक सोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हॉट्सअॅप पिंकच्या नावावर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका.

लिंकला क्लिक केल्यानंतर फोन हॅक होत असून तुम्हाला तुमचा फोन वापरता येणार नाही. याद्वारे तुमचे फोटो, एसएमएस, संपर्क आदी चोरी केले जाऊ शकतात.


पुढील बातमी
इतर बातम्या