'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'चं रौप्य महोत्सवी 'नाट्यदर्शन'

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • नाटक

'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाट्यदर्शनाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात २७ मार्च ते २९ मार्च २०१८ दरम्यान तीन दिवसीय 'नाट्य महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.

यापूर्वी दिल्ली, दादर आणि पनवेल इथं या कलात्मक नाट्यमहोत्सवाचे प्रयोग यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेले आहेत. प्रेक्षक सहयोग आणि सहभागितेने आयोजित या उत्सवात ज्येष्ठ रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांची ३ क्लासिकल नाटकं सादर करण्यात येणार आहेत.

कुठल्या नाटकांचा समावेश?

या नाटकांमध्ये आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत 'माणुसकीला'शोधणारे नाटक 'गर्भ', खरेदी आणि विक्रीच्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारं नाटक 'अनहद नाद' (Unheard Sounds of Universe) आणि अर्ध्या लोकसंख्येचा आवाज, पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक 'न्याय के भंवर में भंवरी' या ३ तीन नाटकांचा समावेश असणार आहे.

ही तिन्ही नाटके वेगळ्या धाटणीची असून कोणत्याही साच्यात न बसणारी तसंच साचेबद्ध चौकटींना मोडून परिवर्तनाची दिशा अधोरेखित करणारी असल्याचं मत 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'चे तुषार म्हस्के यांनी व्यक्त केलं.

काय आहे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'?

सन १९९० नंतरच्या अर्थहीन होण्याच्या काळात, एकाधिकारशाही आणि वर्चस्ववादी धोरणांच्या काळात, विज्ञान हे तंत्रज्ञाना पुरते सीमित होण्याच्या काळात, केवळ खरेदी-विक्री यांवर भर असण्याच्या या काळात जनतेला त्यांच्या मुद्यांवर 'चिंतन' करण्यासाठी एका विचारमंचाची आवश्यकता आहे, या जाणिवेने १२ ऑगस्ट १९९२ पासून 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' हा रंगसिद्धांत' चिंतन मंच' म्हणून उदयास आला. १२ ऑगस्ट २०१७ रोजी या रंगसिद्धांताने आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाट्यदर्शनाने देश-विदेशात जागतिक ओळख मिळवली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या