'टिळक आणि आगरकर'सोबत रंगभूमीवर अवतरणार 'वाजे पाऊल आपुले'

  • संजय घावरे
  • नाटक

१९६७ मध्ये रंगमंचावर सादर झालेलं प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित, दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर आणि मंगला संझगिरी यांच्या अभिनयानं पावन झालेल्या 'वाजे पाऊल आपुले' तसंच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं 'टिळक आणि आगरकर' ही नाटकं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

नाटकांचं पुनरुज्जीवन

या दोन्ही बहुचर्चित नाटकांचं पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याचं संस्थेचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव, नाट्यशाखा कार्यवाह प्रमोद पवार, आणि उपाध्यक्ष जयंत सावरकर यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. या संस्थेच्या इतर दर्जेदार आणि लोकप्रिय नाटकांचीही लवकरच पुनर्निर्मिती होणार असल्याचे संकेतही प्रमोद पवारांनी दिले आहेत. अष्टपैलू साहित्यिक, नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या विनोदी 'वाजे पाऊल आपुले' या तुफान गाजलेल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग येत्या २४ नोव्हेंबरपासून सर्वत्र सुरू होत असून ते संपूर्ण नव्या संचात येत आहे.

या कलावंतांच्या भूमिका

जुन्या संचात काम केलेले आणि सध्या हयात असलेले एकमेव जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करत असून, त्याकाळी या नाटकात सादर केलेलीच भूमिका ते आताही साकारत आहेत. अभिजित चव्हाण या नाटकातली भगवंत ही मध्यवर्ती भूमिका करत असून, त्यांच्या जोडीला पूर्णिमा तळवलकर सुशिलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. सोबत अंशुमन म्हसकर, अमेय बोरकर आणि दिपकार पारकर हे कलावंतही आहेत.

दिग्दर्शक कोण?

विश्राम बेडेकरलिखित 'टिळक आणि आगरकर' हे सुमारे तीन दशकांपूर्वी साहित्य संघाने रंगभूमीवर आणलेलं नाटक २०१८ मध्ये पुनश्च रंगभूमीवर येत आहे मात्र थोडं वेगळ्या स्वरुपात. या नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोग प्रथम होणार आहेत, त्यानंतर हे नाटक नव्या संचात संघातर्फे सादर केलं जाणार आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं हे नाटक दिग्दर्शित करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे 'लोकमान्य एक युगपुरुष' या चित्रपटाचे संवादकार कौस्तुभ सावरकर यांनी.

'हे' प्रयोग विशेष लक्षवेधी

अभिनेता अक्षय पेंडसे यांच्या निधनानंतर कौस्तुभ सावरकर यांनी या नाटकाच्या अभिवाचनाच्या प्रयोगांना पूर्णविराम दिला होता. संघाने वाचिक अभिनयाद्वारे पुन्हा रसिकांना हा अलौकिक आनंद देण्याचं ठरवलं असून हे प्रयोग विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. 'टिळक आणि आगरकर' नाटकाच्या अभिवाचनात सहभाग घेणाऱ्या कलावंतामध्ये गोपाळराव जोशी (उन्मन बाणकर, गोपाळराव आगरकर (अंगद म्हसकर, यशोदा आगरकर (मिथिला मुरकुटे, बळवंतराव टिळक(कौस्तुभ सावरकर) तसंच 'श्री. नाट्यरंग कर्जत'च्या नवोदित गुणी कलावंतांचाही सहभाग आहे. हे प्रयोग 'श्री. नाट्यरंग कर्जत' या संस्थेच्या सहकार्याने सादर होणार आहेत.

पन्नास वर्षांनी पुन्हा रंगमंचावर

या नाटकाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना जयंत सावरकर म्हणाले की, १९६७ साली 'वाजे पाऊल आपुले' या नाटकाचे शेवटचे प्रयोग झाले, त्यानंतर पन्नास वर्षांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचे धाडस आम्ही करत आहोत. हे नाटक खुसखुशीत संवादाने नटलेलं आहे. 'संशय कल्लोळ' या एकमेव नाटकाव्यतिरिक्त संशय या विषयावर दुसरं गोड कौटुंबिक नाटक आलेलं नसावं.

नटांच्या एरवींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा हे नाटक खूप वेगळं आहे. विश्राम बेडेकरांच्या हाताखाली सुमारे अडीच वर्षे त्यांचा सहाय्यक म्हणून काम केल्यामुळे आज हे नाटक बसवताना त्या अनुभवाची खूप मदत झाल्याचंही सावरकर म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या