एसटीच्या उत्पन्नात वाढ; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवली. त्यानंतर नुकताच काही दिवसांपुर्वी दिवाळी पार पडली. या दिवाळीनिमित्त नियमित एसटी बरोबर दिवाळीत जादा बस सोडल्यानं प्रवाशांनी एसटीला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळं ११ नोव्हेंबरपासून १० दिवसांत ११० कोटींचा महसूल महामंडळाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळं प्रवासी उत्पन्न नसल्यानं एसटीला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. लॉकडाऊनपूर्वी एसटीतून दररोज ६४ लाख प्रवासी प्रवास करत होते. तर उत्पन्न २२ कोटी रुपये होते. परंतु, कोरोनाच्या धास्तीनं एसटीपासून प्रवासी दुरावलेला आहे. 

दिवाळीपूर्वी १ ते १० नोव्हेंबपर्यंत दररोज सरासरी १० हजार ५०० बसमधून १३ लाख ३८ हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळं दररोज ७ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा होत होतं. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळानं ११ नोव्हेंबरपासून दररोज १ हजार जादा बस सोडण्यास सुरुवात केली. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि दररोजच्या उत्पन्नात ३ ते साडेतीन कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळं महामंडळाला ११ ते २० नोव्हेंबपर्यंत ११० कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

दिवाळीनंतर ९वी ते १२वी शाळेचे वर्ग सुरू झाल्यामुळं, राज्यभरातील प्रार्थनास्थळंही उघडल्यामुळं एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्याची शक्यता आहे. जिथे जिथे शाळा सुरू झाल्या आहेत, तेथे व्यवस्थापनाच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शालेय फेऱ्यांची व्यवस्थाही एसटीकडून करण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या