मुंबईत लवकरच १३४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार

मुंबईतील लोकसंख्या सातत्याने वाढती आहे. त्यामुळेच रस्त्यावरील वाहनांची गर्दी व परिणामी प्रदूषणही वाढत आहे. यासाठीच राज्यभरात चार्जिंग केंद्रांच्या उभारणीत मुंबईला प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय, पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांची गरज आहे. विद्युत वाहनखरेदीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुंबईत लवकरच १३४ चार्जिंग स्टेशन्स तातडीने उभे होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे.

राज्य सरकार अंतर्गत असलेल्या महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. ही कंपनी मुंबईत एकूण १,५०० चार्जिंग केंद्र उभे करणार आहे. पहिल्या टप्प्यात १३४ केंद्रे उभारली जातील. त्यासाठी कंपनीने स्वारस्याची अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) या प्रकारातील निविदा काढली आहे. 

या अंतर्गत १२ वर्षांच्या भाडेपट्टीवर ही केंद्र उभे होतील. त्यासाठी किमान १०० चौरस मीटर जागेची गरज असेल. येत्या काळात रस्त्यावरील एकूण वाहनांपैकी किमान २५ टक्के वाहने विद्युत श्रेणीतील असतील, या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले. विद्युत वाहनधारकांना येथून ५.५० रुपये प्रति युनिट या सवलतीच्या दरात वाहन चार्ज करता येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या