राज्यात १५ हजार ४६२ खासगी वाहनं एसटीच्या मार्गावर

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. गेली अनेक दिवस कर्मचारी संपावर असल्यानं रस्त्यावर एसटी धावली नाही. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. शिवाय, एसटीच्या मार्गावर खासगी बस, शालेय बस तसंच अन्य खासगी वाहनं चालवण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली. सुरुवातीला कमी प्रमाणात धावत असलेल्या या खासगी सेवांमध्ये वाढ होऊ लागल्याचं समजतं. त्यानुसार, राज्यात १५ हजार ४६२ खासगी वाहनं एसटीच्या मार्गावर धावत असल्याची माहिती समोर येत आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून राज्यातील काही आगारांमध्ये संप सुरू केला. २५० आगारांपैकी फक्त राज्यातील २५ ते ३० आगारांमध्येच संप सुरू होता. त्यामुळं ७० ते ८० टक्के एसटी सेवा सुरूच होती. परंतु, हा संप अधिक तीव्र झाला आणि एसटी सेवा ठप्प झाली.  प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप मिटेपर्यंत खासगी प्रवासी बस, शालेय बस, कंपनीच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहनं चालवण्याची परवानगी राज्य शासनानं दिली.

मुंबईत एसटीचे तीनही आगार सध्या बंदच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळं आगारातून किंवा त्याच्या बाहेरून एसटी सुटत नाहीत. परंतु, अन्य ठिकाणाहून एसटीच्या मार्गावर खासगी वाहनांना एसटीचे प्रवासी घेऊन जाण्याची मुभा असल्यानं मुंबईतून ४ हजार ११४ वाहनं धावत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या