मोबाइल स्कॅन करा, रेल्वे तिकीट काढा!

प्रवाशांची तिकीटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘यूटीएस ऑन मोबाइल’ हे अप्लिकेशन आणले खरे, परंतु त्याला प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यामागचे कारण म्हणजे अॅपवरून तिकीट काढल्यानंतर त्याची छापील प्रत मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने बहुतांश प्रवासी अॅपवरून तिकीट काढण्याचे टाळतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ मोबाइल स्कॅन केल्यावर सहजरित्या तिकीट हाती येईल, अशी यंत्रणा विकसित केली असून या नव्या 'एटीव्हीएम' पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रत्येकी पाच निवडक स्थानकांवर लावण्यात येणार आहेत.

अशी येते अॅपवरून तिकीट काढताना अडचण-

सद्यस्थितीत ‘यूटीएस ऑन मोबाइल’ अॅपवरून तिकीट काढल्यावर संबंधित तिकीटाची माहिती आणि कोड क्रमांक प्रवाशाच्या मोबाइलवर येतो. स्थानकात शिरल्यानंतर हा कोड आणि मोबाइल क्रमांक त्याला ‘एटीव्हीएम’ यंत्रात टाकावा लागतो. त्यानंतर प्रवाशाच्या हाती तिकीटाची छापील प्रत येते. हा सर्व प्रकार किचकट असल्याने बहुतांश रेल्वे प्रवासी रांगेत उभे राहणेच पसंत करत आहेत. परिणामी तिकीट खिडकीवरील रांगाही तशाच आहेत.

मोबाइल नेटवर्क, जीपीएसचे अडथळे -

रेल्वेच्या 'क्रिस' (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम)ने प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी पेपरलेस मोबाइल तिकीट सुविधा सुरू केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डिसेंबर 2015 मध्ये दादर रेल्वे स्थानकात या सुविधेचे उद्घाटन केले होते. परंतु मोबाइल नेटवर्क आणि जीपीएसमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवाशांना पेपरलेस तिकीट काढणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे या तिकीटांची छापील प्रत देण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली. त्यानुसार रेल्वेने 'एटीव्हीएम'द्वारे तिकीटाची छापील प्रत देण्यास सुरूवात केली. मात्र ही छापील प्रत मिळवणेही अवघड जात असल्याने आता प्रवाशांपुढे मोबाइल स्कॅन करून तिकीट मिळवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

काही वेळेस मोबाइल नेटवर्क आणि जीपीएसमध्ये अडथळे येत असल्याने प्रवासी पेपरलेस मोबाइल तिकिटांऐवजी प्रिंटचा पर्याय निवडतात. त्यानुसार स्थानकात आल्यानंतर 'एटीव्हीएम'मधून त्यांना तिकीटाची प्रिंट मिळवता येते. परंतु हे तिकीट मिळवतानाही वेळ जातो. हे पाहता मोबाइलवरील तिकिटाची माहिती स्कॅन करून प्रिंट देणारे यंत्र बसवण्यात येणार आहे. हे यंत्र भिंतीवर बसवण्यात येईल. त्याचा आकार सध्याच्या 'एटीव्हीएम'पेक्षा लहान असेल. महिनाभरात ही यंत्रे बसवण्यात येणार असून मोबाइलवर आलेल्या 'आयआर कोड'द्वारे मोबाइल स्कॅन करता येईल. पहिल्यांदा पश्चिम रेल्वेच्या पाच आणि नंतर मध्य रेल्वेच्या पाच स्थानकांवर प्रत्येकी 25 'एटीव्हीएम' यंत्रे बसवण्यात येतील. दोन्ही रेल्वे प्रशासनाकडून स्थानकेही निश्चित केली जातील. त्यानंतरच 'एटीव्हीएम' बसवली जातील. प्रवांशाच्या प्रतिसादानंतर आणखी मशीन बसवण्यात येतील.
- उदय बोभाटे, महाव्यवस्थापक, मुंबई विभाग, क्रिस

या स्थानकांवर येणार मोबाइल स्कॅनर मशीन्स -

पश्चिम रेल्वे - चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली

मध्य रेल्वे - सीएसएमटी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण

पुढील बातमी
इतर बातम्या