पहिल्या लेडिज स्पेशल ट्रेनला 25 वर्षे पूर्ण

मुंबईत पहिली महिला स्पेशल ट्रेन 5 मे, 1992 रोजी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान चालवण्यात आली होती. शुक्रवारी 5 मे, 2017 रोजी या महिला स्पेशल लोकलने 25 वर्ष पुर्ण केली आहेत. या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्वावर दोन उपनगरीय रेल्वेमधल्या महिलांच्या डब्यात टॉकबॅक सिस्टिम सुरू केली आहे. संकटसमयी टॉकबॅक सिस्टिमचे बटन दाबल्यानंतर थेट गार्डशी संपर्क होईल आणि तात्काळ मदत मिळेल.

पश्चिम रेल्वेवर 5 मे, 1992 रोजी जगातील पहिली महिला विशेष ट्रेन धडाक्यात सुरू झाली होती. सन 1993 मध्ये विरारपर्यंत याचा विस्तार करण्यात आला. दक्षिण मुंबईत 1990 च्या दशकात औद्योगिक आणि वाणिज्य विकास जलद गतीने झाला. त्यामुळे नोकरदार महिलांच्या संख्येतही वाढ झाली. प्रवासादरम्यान महिलांच्या संख्येत वाढ झाल्याने महिलांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. सद्यस्थितीत मुंबईत दिवसाला महिलांसाठी 8 विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. सकाळी आणि संध्याकाळी ही ट्रेन चालवली जाते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पश्चिम रेल्वेने 60 महिला डब्ब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले आहेत.

महिला विशेष गाड्या पुढील प्रमाणे

विरार-चर्चगेट
सकाळी 07.35 ते सकाळी 09.17

चर्चगेट - बोरीवली
संध्याकाळी 5.39 ते संध्याकाळी 6.48

बोरीवली-चर्चगेट
सकाळी 07.41 ते सकाळी 08.47

चर्चगेट-विरार
संध्याकाळी 6.13 ते संध्याकाळी 7.56

भायंदर-चर्चगेट
सकाळी 09.06 ते सकाळी 10.30

चर्चगेट-भायंदर
संध्याकाळी 6.51 ते रात्री 8.14

वसईरोड-चर्चगेट
सकाळी 9.56 ते सकाळी 11.09

चर्चगेट-विरार
संध्याकाळी 7.40 ते रात्री 09.06

पुढील बातमी
इतर बातम्या