Maharashtra Budget 2022 : ‘एसटी’ला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या देणार

महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळासाठी मोठी तरतुद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाया कर्मचाऱ्यांसाठीही निधीची तरतुद करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३ हा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधींची तरतूद केली जात आहे.

एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. शिवाय, परिवहन विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील ३ महिन्यांहून अधिक काळापासून एसटीचे अनेक कर्मचारी आंदोलन करत आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून रस्त्यावर एसटी धावली नाही. त्यामुळं एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या