मध्य रेल्वेकडून ७५ स्थानकांचा पुन्हा आढावा, प्रवासी सुविधांवर विशेष लक्ष

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्रवाशांना सुविधा पुरवण्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांचा आढावा घेतला जात आहे. ज्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म अरुंद आहेत अशा प्लॅटफॉर्मवर असणारे कॅन्टीन्स आणि स्टॉल्स हटवण्यात येत आहेत.

वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने स्थानके स्टॉलमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेतर्फे स्थानकांची पाहणी सुरू आहे. स्थानक पाहणीत प्रवासी सुविधांचा आढावा घेत प्रवाशांना अधिकाअधिक सुविधा देण्यात येतील.

७५ स्थानकांचा पुन्हा आढावा

मध्य रेल्वेच्या ७५ स्थानकातील प्रवासी सुविधांचा पुन्हा आढावा घेतला जात आहे. पाहणीअंती या स्थानकांची क्षमता, स्थानक फलाटांवरील वर्दळ लक्षात घेत संबंधित स्टॉल हटवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

प्रवासी वर्दळ जास्त असलेली स्थानके निश्चित करत, खाद्यपदार्थांचे स्टॉल त्वरीत हटवण्यात येणार आहेत. तसंच स्थानकातील खाद्यपदार्थ विक्री स्टॉलची परवाने नूतनीकरण प्रक्रियाही थांबवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने १७ पादचारी पुलांची उभारणी वेगाने केली असून आणखी २२ पादचारी पुलांची बांधणी सुरू आहे. सरकते जिने आणि लिफ्ट उभारण्याच्या कामानांही वेग आला असल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं.

चर्चगेट स्थानकाप्रमाणे सीएसएमटी स्थानकांत उपनगरीय फलाटांच्या मध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सध्या नवीन आसने बसवण्यात आली आहेत. अशा प्रकारचे आसने लोकप्रतिनिधी फंडातून विविध स्थानकांवर बसवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या