आता 'या' मार्गावरही धावणार एसी लोकल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव/वांद्रे/पनवेल आणि वाशी मार्गावर सोमवारपासून एकूण १६ एसी लोकल सुरू झाल्या आहेत. एसी लोकल फेऱ्यांमधून प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना प्रथम श्रेणी तिकीट दरांपेक्षा अधिक रुपये मोजावे लागणार आहेत.

मध्य रेल्वेकडे अतिरिक्त लोकल उपलब्ध नसल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील एसी लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटी-गोरेगाव हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्या या बदली तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. सध्या धावत असलेल्या सर्वसाधारण वातानुकूलित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी नव्या वर्षात नेहमीच्या साध्या लोकल फेऱ्यांची संख्या कमी होणार आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांना अत्यल्प प्रतिसाद लाभत होता. या लोकलमधून नोव्हेंबरमध्ये रोज सरासरी ४० प्रवासी प्रवास करत होते. डिसेंबरमध्ये ही संख्या ५३वर पोहोचली. या अत्यल्प प्रतिसादामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे आणि सीएसएमटी-वाशी या मार्गावरील प्रत्येकी ४ साध्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्या जागेवर एसी लोकलचा समावेश करण्यात आला आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीटदर कमी करण्याबाबत रेल्वे मंडळाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

गोरेगाव हार्बर वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक

  • सीएसएमटी-पनवेल - सकाळी ४.५२
  • सीएसएमटी-वांद्रे - सकाळी ७.५१
  • सीएसएमटी-गोरेगाव - सकाळी ९.०२
  • सीएसएमटी-वाशी - सकाळी ११.०८
  • सीएसएमटी-गोरेगाव - दुपारी ५.३७
  • सीएसएमटी-वाशी - सायंकाळी ७.४४
  • सीएसएमटी-पनवेल - रात्री ९.४२
  • सीएसएमटी-वांद्रे - रात्री १२.३६
  • वांद्रे-सीएसएमटी - सकाळी ४.१७
  • पनवेल-सीएसएमटी - सकाळी ६.२९
  • वांद्रे-सीएसएमटी - सकाळी ८.२८
  • गोरेगाव-सीएसएमटी - सकाळी १०.०६
  • वाशी-सीएसएमटी - दुपारी ४.४४
  • गोरेगाव-सीएसएमटी- सायंकाळी ६.४४
  • वाशी-सीएसएमटी - रात्री ८.४९
  • पनवेल-सीएसएमटी - रात्री ११.१३
पुढील बातमी
इतर बातम्या