सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला गती

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (सीएसएमटी) पुनर्विकास करून चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. खासगी विकासकांमार्फत सीएसएमटी इमारत व परिसराचा पुनर्विकास केला जाणार असून त्याला आणखी गती मिळणार आहे. त्याच्या पुनर्विकासासाठी सर्व संस्थांशी बोलून दीड महिन्यात समस्या सोडविण्यात याव्यात, असे आदेश रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.

पुनर्विकासासोबत सीएसएमटी परिसरात 'रेल मॉल'ही उभारण्याचा विचार आहे. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाच्याही सुविधा असतील. ज्या कंपनीबरोबर यासंदर्भातील करार केला जाईल त्या कंपनीला या रेल्वे स्थानकावरील उद्योगांसंदर्भातील देखरेख आणि इतर (कमर्शियल) कारभार काही वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिला जाणार आहे.

या पुनर्विकास प्रकल्पासाठी एक हजार ६४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निविदा रुची प्रक्रि याही राबविली जात आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक पुनर्विकासाचा आढावा घेतला. यात सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, मुंबई सेन्ट्रलसह अन्य स्थानकांच्या कामाची माहिती घेतली.

या पुनर्विकास कामाला गती द्या आणि त्यात येणाऱ्या अडचणी दीड महिन्यात सोडविण्याचे आदेश दानवे यांनी रेल्वे प्रशासन व अन्य यंत्रणेला दिले. सीएसएमटीच्या १८ क्रमांकाच्या फलाटाबाहेर असलेल्या पी. डी’मेलो मार्गाजवळ हार्बरमार्ग स्थलांतरित केला जाणार आहे. तेथे मेट्रो ११ ची मार्गिका येत आहे. तसेच ईस्टर्न फ्री वेचेदेखील काम एमएमआरडीएकडून केले जाणार आहे. हे सर्व एकाच ठिकाणी होणे आवश्यक असून मल्टी मॉडेल हब तयार होणार आहे.

दादर स्थानकाच्याही पुनर्विकासाचे नियोजन भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळाने के ले असून त्यावर आमचे मत त्यांना सांगितले आहे. जेव्हा या स्थानकाचेही नियोजन पूर्ण होईल, तेव्हा चर्चेसाठी राज्य सरकारकडे जाऊ, असेही दानवे म्हणाले. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळाने घेतला आहे.

या स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानक अपंगस्नेही करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करणे ही उद्दिष्टे आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या