एसी लोकलला प्रवाशांची प्रतीक्षा कायम

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून एसी लोकल गाडी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना आरामदायी व सुखर प्रवास व्हावा यासाठी ही लोकल सुरू करण्यात आली. परंतू, अद्याप ही लोकल सुरू होऊन २५ दिवस उलटले तरी प्रवाशांचा या गाडीला अल्प प्रतिसाद आहे. आतापर्यंत फक्त ३४१ तिकिटं व ३१५ पासचीच विक्री झाली आहे.

मागील ७ महिन्यांपेक्षाही जास्त पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल बंद होती. १५ ऑक्टोबरपासून एसी लोकल सुरू झाली. सुरुवातीला या लोकलच्या १० फेऱ्या होत होत्या. नुकत्याच आणखी २ फेऱ्या वाढवण्यात आल्या. फेऱ्या जरी वाढवण्यात आल्या, तरीही प्रवासी मात्र मिळालेले नाहीत. एका एसी लोकलची प्रवासी क्षमता ५,९६४ आहे. मात्र, कोरोनाच्या काळात एका लोकलमधून ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे.

या एसी लोकल गाडीला खूपच अल्प प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीत, ऑक्टोबरच्या १५ दिवसांत १७९ तिकीट आणि १९७ महिन्यांचे पास विक्रीला गेले. त्यातून ४ लाख ६९८ उत्पन्न मिळाले. नोव्हेंबरमध्ये १६२ तिकिटे व ११८ पास प्रवाशांनी घेतले आहेत. शनिवार व रविवारीही एसी लोकल धावते. परंतु या दिवशीही प्रवासी फिरकलेले नाहीत. १ नोव्हेंबरला ५ तिकिटे व १२ पासची विक्री झाली. तर ८ नोव्हेंबरलाही अवघी ४ तिकिटे व ९ पास प्रवाशांनी घेतल्याचं समजतं.

पश्चिम रेल्वेला आतापर्यंत एकूण ६ लाख ५५ हजार रुपये उत्पन्न मिळालं आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरू नये यासाठी सरकारी, खासगी कार्यालयांबरोबरच खासगी वाहनांमधील एसी यंत्रणा बंद ठेवा किंवा त्याच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना शासनाकडून मार्चपासून करण्यात आल्या. लॉकडाऊन होताच साधारण २० मार्चपासून पश्चिम एसी लोकलची सेवाही बंदच ठेवण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या