खूशखबर! अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी

सरसकट सर्व महिलांना बुधवारपासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. बुधवारपासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. २१ ऑक्टोबरपासून मुंबई आणि उपनगरांमधील सर्व महिलांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनपासून बंद असलेल्या ट्रेन आणि त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेतेल्या लोकांसाठी सुरु झालेल्या ट्रेन्सचे दरवाजे आता सरसकट सर्व महिलांसाठीही खुले झाले आहेत.

महिलांना लोकलचा प्रवासाची परवानगी द्यावी यासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. शुक्रवारी राज्य सरकारनं सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचं म्हटलं होतं. मात्र रेल्वे बोर्डानं यासंदर्भातली संमती नाकारली होती.

मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असं वाटत असतानाच तो जैसे थेच राहिला. अशातच आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र पाठवलं. त्याची मात्र दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली दिसत असून महिलांना राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या