मुंबईकर म्हणतात 'बेस्टपेक्षा टॅक्सीच बरी!'

बेस्ट बस आणि लोकल रेल्वे ही वाहतूक सेवा मुंबईची लाईफ लाईन समजली जाते. सरकार एकीकडे लोकल रेल्वेच्या विकासासाठी अनेक योजना आखत आहे, दुसरीकडे बेस्ट मात्र, आर्थिक तोट्यात चालली आहे. मुंबईत बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी, आता शेअर रिक्षा आणि टॅक्सीची मागणी देखील वाढत आहे. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पूर्वी मुंबईकर बेस्टच्या बसने प्रवास करत होते. पण आता शेअर रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी याचा वापर करत आहेत. त्यामुळे फक्त वेळच वाचत नाही तर पैशाचीही बचत होते. याचा फटका मात्र बेस्टला बसत आहे. कधी काळी सर्वात बेस्ट समजली जाणारी बेस्ट बसची वाहतूक आता बेस्ट राहिलेली नाही.          

दररोज किमान 70 लाख मुंबईकर प्रवास करतात. यासाठी लोकल आणि बेस्ट बसची वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. लांबचे ठिकाण गाठण्यासाठी प्रवासी लोकल रेल्वेने जाणे पंसत करतात. पण जवळचे अंतर असेल तर मुंबईकर यापूर्वी बसनेच प्रवास करणे पसंत करत होते. पण आता मात्र असे काही राहिलेच नसल्याचे चित्र आहे. हायस्पिड जमान्यात बेस्ट आता पूर्वीच्या तुलनेत पिछाडीवर गेली आहे. पूर्वी घरापासून स्टेशपर्यंत जाण्यासाठी बस हा एकच पर्याय उपलब्ध होता. पण आता शेअर रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच त्यांचे दरही स्वस्त असल्याने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर आता ओला, उबर यांसारख्या कंपन्यांनी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बुकिंगची सेवा मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देत अनेक नवनवीन ऑफर्स देखील सुरू केले आहे. त्यामुळे ही कॅब सेवा देखील प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे.            

सध्या एक बस दर 20 मिनिटांच्या अंतराने धावते. तोटा होत असल्याने बसने आपले अनेक मार्ग बंद केले आहेत. या आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी बेस्टने 100 बस विकल्या आहेत.  


शेअर रिक्षाने कांदिवली स्टेशनहून चारकोपला पोहचण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. तर कधी कधी बेस्टच्या बसने जाताना हेच अंतर गाठण्यासाठी 40 ते 50 मिनिटे लागतात. याशिवाय अनेकदा बसची ताटकळत वाट पाहावी लागते.  

- प्रसाद शाहु, प्रवासी


मुंबईत वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे. याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर होतो. बेस्ट प्रशासनाने बसची संख्या कमी केली. अनेकदा तर बेस्टचे कर्मचारी प्रवाशांना चांगली वागणूक देत नाही. त्यामुळेच मी रिक्षा आणि कॅबने प्रवास करतो.

दीपक पाठक, प्रवासी

मुंबईतील लोकप्रिय बेस्ट बसची वाहतूक सध्या व्हेंटिलेटरवर आहे. पण ही सेवा कायमची बंद झाल्यास खासगी गाड्यांची मनमानी वाढेल आणि त्याचा परिणाम सरळ सामान्य नागरिकाच्या खिशाला बसेल.


पुढील बातमी
इतर बातम्या