प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 'बेस्ट घेणार 'एसटी'ची मदत

मुंबई लोकल सेवा वाहतुकीसाठी बंद असल्यानं बेस्ट व एसटीच्या प्रवाशी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवाशांच्या या वाढत्या संख्येमुळं बेस्ट बसमध्ये  प्रवासादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई महापालिका एसटीच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाहनचालकासह २५० गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील. या गाड्या बेस्टच्या मार्गावर धावणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बसगाड्या आहेत. परंतु यातील काही गाड्याचे आयुर्मान संपल्याने व भाडेतत्त्वावरही १,२०० पैकी के वळ ४६० गाड्याच दाखल झाल्याने बेस्ट पूर्णपणे गाड्या चालवू शकत नाही. फक्त ३,२०० ते ३,३०० पर्यंतच गाड्या धावतात. बेस्टची प्रवासी संख्या वाढत असून ती १६ लाखांपर्यंत गेली आहे. परिणामी करोनाकाळात बेस्टच्या गाड्याना प्रचंड गर्दी होत आहे.

नोकरदारांना मुंबईत येताना होणारा गर्दीचा त्रास पाहून बेस्टच्या मदतीला एसटीच्या २५० बस गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर किलोमीटरमागे ७५ रुपये भाड्याने या बस घेण्यात येणार असून त्यातूनच एसटी महामंडळाला इंधन, देखभाल, चालक, वाहकाचा खर्च दिला जाणार आहे.

बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी वाढती गर्दी लक्षात घेता महापालिकेने पुढाकार घेऊन एसटीच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची सूचना सरकारला केली होती. त्यामुळे आता बेस्टच्या मार्गावर धावणार आहेत. नुकत्याच एसटी महामंडळानेही १४० अतिरिक्त गाड्या मुंबई महानगरात सुरू केल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या