फास्टॅग वापरावरील सवलतीस मोठा प्रतिसाद

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं रस्ते वाहतुकीसाठी फास्टॅग बंधनकारक केलं. राजीव गांधी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटारगाडी, जीप व एसयूव्ही वाहनांना फास्टॅग वापरावर दिल्या जाणाऱ्या सवलतीस मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ७ दिवसांत ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांना ५ टक्के  सवलतीपोटी १९ लाख ८ हजार ५९७ रुपये परतावा देण्यात आला.

अधिकाअधिक वाहनचालकांनी फास्टॅग वापरण्यास सुरुवात करावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मर्यादित कालावधीसाठी या २ मार्गावर ११ जानेवारीपासून प्रत्येक फेरीमागे पथकराच्या ५ टक्के सवलत देण्याची योजना जाहीर केली. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरील पथकर नाक्यांवर ही सवलत देण्यात येत आहे.

यामध्ये ११ ते १७ जानेवारी या ७ दिवसात एकूण ३ लाख ४५ हजार १५५ वाहनांनी या सवलतीचा लाभ घेतला. सवलत रक्कमेच्या परताव्यापोटी एमएसआरडीसीने १९ लाख ८ हजार ५९७ रुपये वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केले.

पथकर नाक्यांवर १०० टक्के फास्टॅग अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीनं अद्यावत करण्याचं काम २२ जानेवारीपर्यंत सुरू राहील, तर २६ जानेवारीपासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. 

पुढील बातमी
इतर बातम्या