रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यात येणार

Representative Image
Representative Image

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाले पालिकेच्या रडारवर आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील रोज चार स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

दरम्यान, 5 ते 31 मार्च दरम्यान मुंबईतील वेगवेगळ्या 53 स्थानक परिसरात 4,473 बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्याने रेल्वे स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.

मुंबईत जागा मिळेल तिकडे बेकायदा फेरीवाले कब्जा करतात. मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील स्थानक परिसरही बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर आणि शाळेपासून 100 मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. मात्र हा आदेश धुडकावून फेरीवाल्यांनी रेल्वे परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पुलावर कब्जा केला आहे.

रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रोज चार रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर, मालाड आदी 53 रेल्वे स्थानक परिसरात 4,773 बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा

लोकसभा निवडणुकीमुळे मुंबईच्या विकासकामांवर परिणाम

राज्यात निवडणुकीच्या काळात ओपिनियन आणि एक्झिट पोलवर बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या