यूटीएस अॅपवर अनारक्षित तिकीट बुकिंगला सुरुवात

रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं खूशखबर दिली आहे. रेल्वे प्रवाशांना यूटीएस अॅपद्वारे आता अनारक्षित तिकिटाचं बुकिंग करता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना यापुढे रेल्वे तिकिटसाठी तासंतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. या यूटीएस अॅपद्वारे रेल्वे प्रवासी कोणत्याही ठिकाणाची तिकिटं बुक करू शकतात. त्याचप्रमाणे लोकलसोबत प्रवाशांना मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरल डब्यांच्या तिकीट सुद्धा बुक करता येणार आहे.

म्हणून यूटीएस अॅप सुरू

प्रवाशांना ऑनलाईन मोबाइल तिकिटींगच्या माध्यमातून 'नॉन कॅश तिकिटींग'कडे आकर्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आपल्या १७ उपनगरीय स्थानकांवर जागरुकता मोहीम राबवली होती. त्याचप्रमाणे प्रवाशांनी डिजीटल तिकिटींगचा जास्तित-जास्त वापर करावा, यासाठी यूटीएस अॅप सुरू करण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच, रेल्वेनं मोबाइल तिकिटींगला प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक आर-व्हॉलेट रिचार्जवर ५ टक्के बोनस देण्याची घोषणा केली आहे.

अॅप अपग्रेड केल्यावर...

यूटीएस अॅपद्वारे तिकीट बुक करण्याची सुविधा मुंबईसह चैन्नईच्या उपनगरीय सिस्टिमसाठी देखील उपलब्ध आहे. यालाच विस्तार देण्यासाठी क्रिसनं (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) गैर-उपनगरीय स्थानकांवर यूटीएस ऑनलाईन मोबाईल अॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, यूटीएस अॅप अपग्रेड केल्यावर मुंबईपासून दिल्लीपर्यंत जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्याचं तिकीट बुक करता येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या