आता एका रात्रीत पोहोचाल दिल्लीत, १६० किमीने एक्स्प्रेस चालवण्यास मंजुरी

गतिमान एक्स्प्रेसला यश मिळाल्यावर रेल्वे प्रशासनाने 'रफ्तार' योजनेअंतर्गत दिल्ली- मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गावर वेगवान एक्स्प्रेस चालवण्याचं ठरवलं आहे. ही एक्स्प्रेस १६० किमी प्रति तास वेगाने धावणार असल्याने प्रवासाच्या वेगात ६० टक्के वाढ होईल. यामुळे अनुक्रमे साडेतीन आणि ५ तासांची बचत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

इतका खर्च अपेक्षित

दिल्ली-मुंबई मार्गासाठी साधारणत: ६,८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर दिल्ली-हावडा मार्गासाठी ६,६८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग २०२२-२३ मध्ये कार्यान्वित करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे.

१२ तासांत दिल्ली

दिल्ली-मुंबई हा मार्ग १,४८३ किमी लांब आहे. हा मार्ग ७ राज्यातून-दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जातो. सद्यस्थितीत मार्गावर १३० किमी प्रति तास वेगाने एक्स्प्रेस धावते. या मार्गाची गती वाढल्यास प्रवाशांना एका रात्रीत म्हणजेच अवघ्या १२ तासांमध्ये मुंबईहून दिल्ली गाठता येणार आहे.  

या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, १६० किमी प्रति तास या वेगाने धावणाऱ्या या रेल्वेंसाठी एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे. देशभरात प्रमुख ९००० किमीच्या मार्गावर या रेल्वे धावतील.


हेही वाचा- 

बेस्टच्या ताफ्यात १० इलेक्ट्रीक बस दाखल

पुणे-मुंबई रेल्वेमार्ग सुरू होण्यास आणखी २ दिवस?


पुढील बातमी
इतर बातम्या