मध्य रेल्वे मार्गावर 'चिखलोली' नवा थांबा

मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ आणि बदलापूर या २ रेल्वे स्थानकांमधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीनं नियोजित करण्यात आलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकास मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य प्रबंधक कार्यालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. गेल्या वर्षी चिखलोली रेल्वे स्थानकास प्रशासनाकडून सहमती दिल्यानंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यादृष्टीने आवश्यक प्रयत्न रेल्वे आणि महसूल विभागाकडून सुरू होते.

या स्थानकाची स्थळनिश्चिती आणि थांबा मिळण्यास मान्यता मिळाल्यानं या प्रकल्पास नव्या वर्षात गती मिळू शकणार आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान सात किमीचे अंतर असून मधल्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. या भागात चिखलोली स्थानक व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. तर हे स्थानक होणार असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरणही झाले होते. परंतु, त्यानंतर या स्थानकाचा मार्ग अडखळला होता. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या स्थानकासाठी व्यापक पाठपुरावा सुरू केला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी या स्थानकाला रेल्वेकडून सहमती दर्शवण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी भूसंपादन आणि इतर प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला होता. तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर अखेर २८ डिसेंबरला मध्य रेल्वेने अंबरनाथ, बदलापूरमधील चिखलोली रेल्वे स्थानकाच्या थांब्याला परवानगी दिल्याचे एका परिपत्रक काढत जाहीर केले.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकापासून चिखलोली रेल्वे स्थानकाचं अंतर ६४.१७ किमी असून अंबरनाथ ते चिखलोली रेल्वे स्थानकाचे अंतर ४.३४ चिखलोली ते बदलापूर रेल्वे स्थानकामधील अंतर ३.१ किमी असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. चिखलोली परिसरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या स्थानकाचे काम पूर्ण करत चिखलोली स्थानकावरून रेल्वे सुरू होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या