मध्य रेल्वेच्या 'तक्रार बूथ'ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

जागतिक महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेवर अनेक उपक्रम राबवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर तक्रार बूथ लावण्यात आला होता. या बूथवर महिलांना आपल्या विविध तक्रारी, समस्या तसंच सल्ले मध्य रेल्वेकडे नोंदवले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान हा बूथ खुला ठेवण्यात आला होता. या उपक्रमाला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.

मोटरमन मुमताज काझी यांचं स्वागत

महिला दिनानिमित्त मुमताज काझी या महिला मोटरमनने कल्याण ते सीएसएमटी अशी ट्रेन चालवली. सकाळी ८ वाजून ०१ मिनिटांनी कल्याणहून लोकल ट्रेन निघाली. ही ट्रन सीएसएमटी स्थानकात ९.३० वाजता पोहोचली. त्यानंतर मुमताज काझी यांचं स्वागत करण्यात आलं.

मुमताज या गेली १३ वर्षांपासून मध्य रेल्वेवर लोकल ट्रेन चालवत आहेत. या क्षेत्रात त्यांना २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुमताज काझी सारख्या महिलांनीच महिला विशेष ट्रेन चालवावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी यावेळी केली.

१४ नंबर प्लॅटफॉर्मवर सॅनिटरी नॅपकिन मशीन

त्याचबरोबर सीएसएमटीच्या १४ नंबर प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मशिनचं उद्घाटन करण्यात आलं. १४ नंबर प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी असलेल्या प्रतिक्षागृहात ही मशीन लावण्यात आली आहे. इथं सॅनिटरी डिसपेंन्सरीज देखील बसवण्यात आली आहे. मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा ममता शर्मा यांच्या हस्ते या मशिनचं उद्घाटन करण्यात आलं.

'असं' वापराल मशिन

या सॅनिटरी नॅपकिन मशीनमधून जर पॅड हवं असेल, तर मशिनमध्ये ५ रुपयांचा कॉईन टाकायचा आहे. त्यानंतर बटन दाबल्यावर तुम्हाला नॅपकिन उपलब्ध होईल. 'चॅरीटन' या संस्थेतर्फे ही सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आली आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या