नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीरानं सुरू आहे. या बिघाडामुळं वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये चाकरमान्यांचा लेटमार्क लागला.

दुरुस्तीकाम सुरू

सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळं सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कुर्ला स्थानकामधून धीम्या गाड्यांची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली. परिणामी जलद तसंच धीम्या मार्गावरील गाड्या उशीराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. ऐन गर्दीच्या वेळी रुळाला तडे गेल्यामुळं लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

हार्बरदेखील विस्कळीत

त्याचप्रमाणं, हार्बर रेल्वे मार्गावर नेरुळ स्थानकादरम्यान मालगाडीचं इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळं तेथील गाड्यांची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित असून युद्धपातळीवर सायन आणि नेरुळ स्थानकामधील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या