वाहतूक पोलिसांमुळे मिळाली चिमुकलीची फी!

चेंबूर - गहाळ झालेली शाळेच्या फीची रक्कम चेंबुरमधील वाहतूक पोलिसांनी मंगळवारी गरीब कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांना परत केली. देवराम चवेकर हे चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात राहणारे असून ते मंगळवारी शाळेत मुलीची फी भरण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यामध्ये त्यांच्या हातातील पिशवी गहाळ झाली. 

सुमननगर वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विष्णू सुरवसे तसेच सुनील सावंत यांना ही पिशवी रस्त्यालगत आढळून आली. त्यामध्ये ज्युनियर शाळेत असलेल्या एका चिमुकलीचे फी बुक आणि त्यामध्ये रोख रक्कम चार हजार रुपये आढळून आले. पोलिसांनी तत्काळ ही बाब सुमननगर वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक दबडे यांच्या निदर्शनास आणून दिली. 

दबडे यांनी आपल्या एका पोलीस शिपायाला मुलीच्या शाळेत पाठवून मुलीच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांना फोन केला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर त्या दाम्पत्यांना त्यांचे पैसे परत दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या